पंतप्रधान मोदी दहशतवादी आहेत
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांचे वादग्रस्त वक्तव्य

चौफेर टीकेवरुन खर्गे यांची सारवासारव
भाजप आक्रमक, माफीची मागणी
चेन्नई/21एप्रिल– तामिळनाडूतील चेन्नई येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, हे लोक (एआयएडीएमके) मोदींशी संबंध कसे ठेवू शकतात? ते एक दहशतवादी आहेत. त्यांचा समानतेवर विश्वास नाही. त्यांच्या पक्षाचा समानता आणि न्यायावर विश्वास नाही. आणि या लोकांनी त्यांच्याशी संबंध ठेवणे म्हणजे ते लोकशाहीला कमकुवत करत आहेत.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला लाज वाटते की काँग्रेस आणि डीएमके अशा घृणास्पद पातळीवर उतरले आहेत, त्यांनी भारताच्या जनतेने लोकशाही मार्गाने निवडून दिलेल्या पंतप्रधानांना दहशतवादी संबोधून त्यांचा अपमान केला आहे. राहुल गांधी आणि एम. के. स्टॅलिन यांनी पंतप्रधानांचा आणि त्यांना सत्तेवर निवडून दिलेल्या भारताच्या जनतेचा केलेल्या या गंभीर अपमानाबद्दल माफी मागावी. या वक्तव्याने काँग्रेस आणि डीएमकेने आपल्या 8 कोटी तमिळ बांधवांसह 14 कोटी भारतीयांचा अपमान केला आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले, ही अपवित्र आघाडी पंतप्रधानांना लक्ष्य करत आहे आणि भारतीयांना दहशतवादी म्हणत आहे. पंतप्रधानांवरील अशा वैयक्तिक हल्ल्यांमुळे त्यांचे निवडणुकीतील भवितव्य बदलणार नाही, जे त्यांच्या गैरकारभारामुळे त्रस्त झालेल्या जनतेच्या संतापाने आधीच ठरले आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या विधानामुळे मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. खर्गे यांच्या या वक्व्याविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच भाजपाच्या संबित पात्रा यांच्यापासून ते के. अन्नामलाई यांच्यापर्यंतचे नेते त्यांच्याविरोधात तुटून पडले आहेत. तसेच खर्गे यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपाचे नेते के अन्नामलाई म्हणाले की, स्वत:चा एक वारसा असलेल्या काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी खूप वाईट भाषेचा वापर केला. ही बाब खूप दुर्दैवी आहे.तर संबित पात्रा यांनीही खर्गे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. खर्गे यांनी केलेलं विधान हे जिभेचं घसरणं नव्हतं. आता जरी ते स्पष्टीकरण देत असले तरी हा काँग्रेसने जाणीवपूर्वक आखलेला कट आहे. आज राहुल गांधींच्या सांगण्यावरून खर्गे यांनी मोदींना दहशततवादी म्हटले. ही तीच काँग्रेस आहे जिचे नेते ओसामा बिन लादेनला ओसामा जी म्हणते आणि देशाच्या पंतप्रधानांना दहशतवादी म्हणते, अशी टीका पात्रा यांनी केली.




