एकनाथ शिंदे यांची बच्चू कडूंना ‘ऑफर’
विधान परिषदेच्या राजकीय मैदानात पुन्हा एकदा ‘धक्का तंत्र’

राज्याच्या राजकारणात नवी खळबळ
अमरावती/20 एप्रिल- राज्यातील आगामी विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय मैदानात पुन्हा एकदा ’धक्का तंत्र’ वापरले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे मुख्य नेते आ. बच्चू कडू यांना विधान परिषदेची मोठी ऑफर दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुंबईत या दोन्ही नेत्यांमध्ये एक गुप्त बैठक पार पडली असून, या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. लहान पक्षांना आणि अपक्ष नेत्यांना सोबत घेऊन आपली राजकीय शक्ती वाढवण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून सुरू असतानाच, आ. बच्चू कडू यांची भूमिका या निवडणुकीत अत्यंत कळीची ठरणार असल्याचे दिसत आहे.मुंबईत झालेल्या या गुप्त भेटीची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून बाहेर आली आहे. या बैठकीत विधान परिषदेसाठी आ. बच्चू कडू यांना संधी देण्याबाबत सविस्तर खलबतं झाल्याचे बोलले जात आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्ता समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आपला राजकीय पाया अधिक मजबूत करण्यासाठी शिंदे गट सध्या स्वतंत्र अस्तित्व असलेल्या नेत्यांना साद घालत आहे. अशा परिस्थितीत आ. बच्चू कडू यांनी काय निर्णय घ्यावा, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, आ. बच्चू कडू यांनी या संपूर्ण प्रकरणावर सध्या अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. त्यांनी या चर्चेला पूर्णविराम न देता, कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आपण आपल्या कार्यकर्त्यांशी आणि समर्थकांशी सविस्तर चर्चा करू, असे स्पष्ट केले आहे. गावागावातील सर्वसामान्य माणसांशी जोडले गेलेले नेते म्हणून आ. बच्चू कडू यांची ओळख असल्याने, त्यांच्या निर्णयाचा परिणाम राज्याच्या राजकारणावर नक्कीच होणार आहे. विधान परिषद निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या या वेगवान हालचालींमुळे सत्ताधारी आणि विरोधक दोघांमध्येही अस्वस्थता वाढली आहे. येत्या काही दिवसांत या राजकीय नाट्याचा पुढचा अंक स्पष्ट होईल, मात्र सध्या तरी या संभाव्य युतीमुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे हे निश्चित.
कार्यकर्त्यांचा कौल महत्त्वाचा
आ. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आपली भूमिका राखून ठेवली आहे. कोणताही निर्णय घाईत घेणार नाही, आधी माझ्या माणसांना विचारणार, असे सांगत त्यांनी चेंडू कार्यकर्त्यांच्या दरबारात टाकला आहे. यामुळे प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये आता उत्साहाचे वातावरण असून, विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.



