अरण्यऋषी हरपला, मारुती चितमपल्ली यांचे निधन
93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई / 18 जून: सोलापूरचे सुपूत्र, सुप्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ, अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते दिल्लीला गेले होते. त्यानंतर त्यांची तब्येत खालावल्याने ते आजारीच होते. त्यांच्या निधनाने मराठीतील थोर साहित्यिक आणि पक्षीतज्ज्ञ गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
वन्यजीव अभ्यासक, ज्येष्ठ लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांचा जन्म सोलापूरमध्ये एका गिरणी कामगार कुटुंबात 12 नोव्हेंबर 1932 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव मारुती भुजंगराव चितमपल्ली असे होते. वाचन आणि शिक्षणाबद्दल त्यांचे वडील खूप जागरूक होते. मुलांनी शिक्षण घेऊन जीवनात काहीतरी साध्य करावं, ही त्यांच्या वडिलांची इच्छा होती. चितमपल्ली यांच्या कुटुंबातील वाचनाची परंपरा, तसेच पूर्वजांकडून झाडांना प्रेम आणि निसर्गाच्या जवळ जाण्याची शिकवण त्यांना मिळाली.
महाराष्ट्रातील अरण्यऋषी अशी ख्याती असलेले चितमपल्ली यांनी माजी वनाधिकारी म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. वनाधिकारी म्हणून सरकारी नोकरी करतच त्यांनी वन, वन्यजीव आणि पक्षीशास्त्र या विषयांना स्वत:ला वाहून घेतलं होतं. मारुती चितमपल्ली यांनी राज्य सरकारच्या वनविभागात 30 वर्ष नोकरी केली. या काळात ते मेळघात व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक देखील होते. या प्रकल्पासह कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य यांच्या विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.
वनविभागात काम करत असताना, त्यांनी पक्षी, प्राणी आणि वनसंपदा याविषयी खूप सखोल संशोधन केले आणि त्यावर अनेक पुस्तके लिहली. त्यांच्या योगदानामुळे मराठी शब्दकोशात अनेक नवीन शब्दांचा समावेश झाला आहे. मराठी भाषेमध्ये सुमारे लाखभर नव्या शब्दांची भर घालणारे वन्यजीव संशोधक म्हणून ते ओळखले जातात. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. त्यांच्या कार्याची दखल घेत, केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांच्या या कार्यासाठी नुकताच 30 एप्रिल 2025 रोजी त्यांना पद्मश्री या सन्मानाने गौरवण्यात आले.
मारुती चितमपल्ली यांना 13 भाषांचे ज्ञान होते. त्याद्वारे आदिवासी व इतर जमातींशी संवाद साधत त्यांनी पर्यावरणाशी संबंधित मोठी माहिती मिळवली. अरण्यवाचनासह प्राणी, पक्षी, वनस्पतीची वैशिष्ट्यांसह वन्यजीवन उलगडून सांगणारी 25 पेक्षा जास्त पुस्तके चितमपल्ली यांनी लिहिली. वन्यजीवांचे संवर्धन, तसेच जैवविविधतेचे संरक्षण यावर महत्वाचे काम केले. त्यांच्या या योगदानामुळे त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.




