भाजपाच्या 46 वर्षांच्या समर्पित प्रवासाचा जल्लोष
जिल्ह्यात सेवाकार्याने वर्धापनदिन साजरा

अमरावती /6 एप्रिल: भारतीय जनता पार्टीच्या 46 व्या स्थापना दिनानिमित्त अमरावतीत कार्यकर्त्यांनी मोठा उत्साह दाखवला असून राष्ट्रसेवेचा संकल्प सोडत हा दिवस साजरा केला. गेल्या चार दशकांहून अधिक काळ जनसेवेसाठी स्वतःला झोकून देणार्या कार्यकर्त्यांच्या त्यागामुळेच पक्षाची आज मोठी भरभराट झाली आहे. याच समर्पित भावनेतून अमरावती शहर आणि ग्रामीण जिल्ह्याच्या वतीने राजापेठ येथील पक्ष कार्यालयात ध्वजारोहण करून विविध जनहितैषी मोहिमांचा श्रीगणेशा करण्यात आला. राजकारणापलीकडे जाऊन समाजकारण करण्याच्या उद्देशाने आयोजित या सोहळ्यात स्वच्छता मोहीम, घर चलो अभियान, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान आणि शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद असे भरगच्च कार्यक्रम राबवण्यात आले. राजापेठ येथील मुख्य कार्यक्रमात शहर जिल्हाध्यक्ष नितीन धांडे आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य फुंकले. यावेळी ज्येष्ठ नेते रवींद्र खांडेकर, श्रीचंद तेजवानी आणि जयंत डेहनकर यांनी आपल्या मनोगतातून पक्षाच्या संघर्षाचा इतिहास मांडला. ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले, अशा झुंजार वीरांना यावेळी मानवंदना देण्यात आली. या सोहळ्याला किरण पातूरकर, चेतन गावंडे, राधा कुरिल, सुनील खराटे, गजानन देशमुख, राजेंद्र मेटे, सुधीर थोरात, प्रवीण उईके, सुनील काळे, संजय नरवणे, सुधा तिवारी, विकी शर्मा, मिलिंद बांबल, राजेश आखेगावकर यांच्यासह सर्व नगरसेवक आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी व गावखेड्यातून आलेले कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रसेवा हाच आमचा धर्म असून सामान्य माणसाच्या प्रगतीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्य करत राहण्याचा निर्धार यावेळी प्रत्येकाच्या चेहर्यावर दिसत होता.




