खासदारांच्या मध्यस्थीनंतर तपोवनच्या चुली पेटल्या
खा.बळवंत वानखडे यांनी प्रशासनाला घेतले धारेवर

* 600 रहिवाशांच्या अन्नाचा प्रश्न सुटला
अमरावती/3 एप्रिल: जिल्हा प्रशासनाच्या कमालीच्या निष्काळजीपणामुळे तपोवन येथील विदर्भ महारोगी सेवा मंडळातील 600 हून अधिक कुष्ठरोगी बांधवांवर महिनाभरापासून उपाशी राहण्याची वेळ आली होती. इंधन वायूच्या (गॅस सिलेंडर) तीव्र टंचाईमुळे येथील स्वयंपाकघरांना टाळे लागण्याची चिन्हे असतानाच, खा. बळवंत वानखडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रशासनाला धारेवर धरले. त्यांच्या मध्यस्थीनंतर तातडीने इंधन वायू उपलब्ध झाल्याने महिनाभरापासून धगधगणार्या लाकडी चुली विझल्या असून रहिवाशांच्या जेवणाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
अमरावती येथील तपोवन परिसरात कुष्ठरोगी बांधवांच्या सेवेचा मोठा यज्ञ सुरू असतो. मात्र, गेल्या महिनाभरापासून येथे इंधन वायूचा पुरवठा विस्कळीत झाला होता. परिस्थिती इतकी बिकट झाली की, संस्थेतील 600 ते 650 रहिवाशांना चहा आणि जेवणासाठी जुन्या लाकडी चुलींचा आधार घ्यावा लागला. परिसरातून सुकी लाकडे वेचून आणायची आणि त्यावर कसाबसा स्वयंपाक रांधायचा, असा केविलवाणा प्रकार येथे सुरू होता. या संस्थेत अनेक वृद्ध माता-भगिनी वास्तव्यास असून, त्यांना या धुराचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष गवई यांच्या नेतृत्वाखाली या गंभीर समस्येबाबत जिल्हा प्रशासनाला रीतसर निवेदन देऊनही अधिकारी सुस्तच राहिले. अखेर खा. बळवंत वानखडे यांनी या प्रकरणात लक्ष घातले. त्यांनी तपोवनमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी केली आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. समाजातील अशा उपेक्षित आणि गरजू घटकांच्या बाबतीत प्रशासनाची ही वृत्ती अत्यंत वेदनादायक असल्याचे त्यांनी म्हटले. खासदारांच्या तडाख्यानंतर यंत्रणा हलली आणि तातडीने इंधन वायूचा पुरवठा करण्यात आला. आजही संस्थेतील महिला आणि कार्यकर्ते एकजुटीने ही अन्नव्यवस्था सावरण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
धुराच्या विळख्यातून सुटका गेल्या महिनाभरापासून तपोवनमधील माता-भगिनींना डोळ्यांत पाणी आणून लाकडी चुलीवर स्वयंपाक करावा लागत होता. डॉ. सुभाष गवई यांनी प्रशासनाकडे वारंवार दाद मागूनही उपयोग झाला नाही. अखेर लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे या 600 रहिवाशांच्या जेवणावरील टांगती तलवार दूर झाली आहे




