अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान!
स्वप्नसुंदरीच्या स्वप्नात आले जहागीरपूरचे मारुतीराया

अमरावती/1 एप्रिल: चैत्र पौर्णिमेच्या मंगल मुहूर्तावर संकटमोचक अंजनीपुत्र हनुमानाचा जन्मोत्सव आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. केवळ अफाट शक्तीचे प्रतीक नसून, प्रभू श्रीरामांवरील अढळ निष्ठा आणि दास्यभक्तीचा आदर्श म्हणून बजरंगबलींचे चरित्र आजही जनमानसावर अधिराज्य गाजवत आहे. ’दैनिक आपली मातृभूमी’ (मंडल मीडिया हाऊस) च्या वतीने या निमित्ताने विशेष पुरवणी प्रकाशित करून भक्तीचा हा वारसा वाचकांसमोर मांडण्यात आला आहे. ज्यांच्या मुखात अखंड रामनाम आहे, त्यांच्यासाठी अशक्य काहीच नाही, हे हनुमंताने लंकादहन आणि द्रोणागिरी पर्वत उचलून जगाला दाखवून दिले. आजच्या धावपळीच्या काळात केवळ दर्शन न घेता, त्यांच्यातील ’स्थितप्रज्ञता’ आणि संकटात डगमगून न जाता धैर्याने उभे राहण्याची कला आत्मसात करणे काळाची गरज आहे. ते केवळ बलवान नसून ’बुद्धिमतां वरिष्ठ’ म्हणजेच बुद्धिवंतांमध्येही श्रेष्ठ आहेत. गाव-खेड्यातील मंदिरांपासून ते शहरांतील मोठ्या उत्सवांपर्यंत सर्वत्र मारुतीरायाचा जयजयकार होत आहे. अहंकाराचा त्याग करून निस्वार्थ सेवेचा वसा घेण्याचा संकल्प आज प्रत्येक भाविकाने करणे हीच त्यांना खरी श्रद्धा ठरेल.
हनुमंताची शिकवण-संकटाच्या वेळी डगमगून न जाता बुद्धी आणि चातुर्याचा वापर कसा करावा, याचा वस्तुपाठ म्हणजे हनुमान! त्यांच्या चरणी नतमस्तक होताना आपल्यातील मीपणा सोडून समाजसेवेचा वारसा जपणे, हाच या जन्मोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
अमरावती : रुक्मिणी मातेच्या भेटीसाठी द्वापर युगात विदर्भात आलेल्या पवनपुत्राचे जहागीरपूर येथील स्थान आजही तितकेच जागृत असून, चक्क स्वप्नात दृष्टांत देऊन सातासमुद्रापार ख्याती असलेल्या अभिनेत्री हेमामालिनी यांना या भूमीने ओढून आणले. हेमामालिनी यांनी केवळ दर्शनच घेतले नाही, तर चिखल तुडवत जाणार्या भाविकांची अडचण ओळखून स्वत: पुढाकार घेत या मंदिरापर्यंतचा पक्का रस्ता तयार करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे पाठपुरावा करून संपूर्ण निधी उपलब्ध करून दिला. आज हनुमान जयंतीच्या पावन पर्वावर या जागृत देवस्थानाचे वैभव आणि भक्तीचा महिमा सार्या विदर्भात दुमदुमत आहे.
अमरावती जिल्ह्यातील जहागीरपूर येथील श्री महारुद्र मारुती मंदिराचा इतिहास अतिशय विलक्षण आहे. आपल्या अभिनयाने जगाला भुरळ घालणार्या सिने अभिनेत्री आणि विद्यमान खासदार हेमामालिनी 1989 मध्ये अचानक या अतिदुर्गम भागातील मंदिरात पोहोचल्या आणि सार्या महाराष्ट्रात चर्चेला उधाण आले. त्यांना स्वप्नात साक्षात हनुमंत रायांनी दर्शन दिल्याने त्या दर्शनासाठी व्याकुळ होऊन येथे आल्या होत्या. त्यावेळी अमरावती ते कौंडण्यपूर मार्गावरून मंदिरात जाण्यासाठी साधा रस्ताही नव्हता. पावसाळ्यात चिखल तुडवत जाणार्या भाविकांचे हाल पाहून हेमामालिनी यांनी या रस्त्यासाठी स्वतःचा निधी देण्याचे जाहीर केले. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना विनंती करून हा रस्ता मंजूर करून घेतला. पुढे 1991 मध्ये जेव्हा रस्त्याचे कामपूर्ण झाले, तेव्हा स्वतः हेमामालिनी पुन्हा एकदा उद्घाटनासाठी आणि मारुतीच्या दर्शनासाठी जहागीरपूरला आल्या होत्या. या देवस्थानची ओढ केवळ हेमामालिनी यांनाच नाही, तर 1995 मध्ये प्रसिद्ध अभिनेते मनोज कुमार यांनीही येथे येऊन नतमस्तक होऊन मारुतीरायाचा आशीर्वाद घेतला होता.
या जागृत देवस्थानाबाबत एक पुरातन आख्यायिका सांगितली जाते. द्वापर युगात जेव्हा प्रभू श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत झाला, तेव्हा हनुमंत राया त्यांना भेटायला गेले होते. भेटीनंतर हनुमंताने रुक्मिणी मातेबद्दल विचारणा केली असता,




