गॅस टंचाईवरून लोकप्रतिनिधी-प्रशासन आमनेसामने

दर्यापुरात सिलिंडरसाठी एक किलोमीटरची रांग

काळाबाजार न थांबल्यास गोदामांवर छापे मारणार

अमरावती /1एप्रिल– जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून घरगुती गॅस सिलिंडरसाठी सुरू असलेल्या वणवण पाचवीलाच पुजली असून, या संकटामुळे आता लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणि शहरांमध्ये गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने सर्वसामान्य गृहिणींचे स्वयंपाकघर विस्कळीत झाले आहे.
आज पहाटे दर्‍यापूर येथे गॅस सिलिंडरसाठी तब्बल एक किलोमीटर लांब रांग लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. नागरिक पहाटे तीन वाजेपासून रिकामे सिलिंडर घेऊन रस्त्यावर उभे असल्याचे पाहून काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी प्रशासकीय कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. वानखडे यांनी तात्काळ जिल्हाधिकार्‍यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून या परिस्थितीची जाणीव करून दिली. सरकारचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असून खेड्यापाड्यात गॅसचा हाहाकार उडाला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. एकीकडे सर्वसामान्यांना गॅस मिळत नसताना दुसरीकडे गॅसचा काळाबाजार जोरात सुरू असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. याच मुद्द्यावर आ. रवी राणा यांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हा प्रशासन आणि पोलीस आयुक्तांना कारवाईचा इशारा दिला आहे. गॅसचा साठा करून काळाबाजार करणार्‍यांची संपूर्ण माहिती आपल्याकडे असून, पुढील 4-5 दिवसांत प्रशासनाने कठोर पावले उचलली नाहीत, तर आपण स्वतः अशा गोदामांवर धाडी टाकणार असल्याचे राणा यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा केवळ रुग्णालय आणि शासकीय कार्यालयांसाठी मर्यादित केल्याने हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. अनेक उपहारगृहांच्या खाद्ययादीतील पदार्थ कमी झाले असून काहींना डिझेल किंवा लाकडाच्या भट्ट्यांचा वापर करावा लागत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि पुरवठा मंत्र्यांशी चर्चा करून व्यावसायिकांना दिलासा देण्याचे आश्वासनही आमदार राणा यांनी दिले आहे. दरम्यान, आमदार सुलभा खोडके यांनीही शहरातील गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत प्रशासनासोबत बैठक घेणार असल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. निनाद लांडे यांनी मात्र जिल्ह्यात तुटवडा नसल्याचा दावा केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button