भाईचारा व सलोख्याचा संदेश देत ईदमीलन सोहळा
नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार

अमरावती / 30 मार्च – राष्ट्रीय एकात्मता आणि जातीय सलोख्याची गौरवशाली परंपरा कायम राखत अमरावती शहराने पुन्हा एकदा भाईचार्याचे उदाहरण सादर केले आहे. साबनपुरा येथील जामा मशीदच्या पुढाकाराने शनिवारी रात्री ’ईद मिलन’ समारंभ आणि नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते. संपूर्ण आयोजनात सामाजिक समरसता आणि परस्पर सद्भावनेचा संदेश पाहायला मिळाला.
खा. बळवंत वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात जामा मशीद कमिटीचे प्रमुख हाजी शकील, उपाध्यक्ष नजीम खान बीके, हाजी निसार, शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सोहळ्यात माजी महापौर व मनपातील विरोधी पक्षनेते विलास इंगोले, शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत, नगरसेवक आणि ’अमरावती मंडळ’चे संपादक अनिल अग्रवाल, सुरेश रतावा, डॉ. संजय शिरभाते, दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी त्रिदीप वानखडे, सादिक शाह, भैय्या पवार तसेच आसिफ तवकल यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. विलास इंगोले यांनी आपल्या भाषणात सांगितले की, अमरावतीची ओळख नेहमीच राष्ट्रीय एकात्मतेसाठी राहिली आहे. खासदार बळवंत वानखडे यांनी क्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. जामा मशीदसमोरील वीज डेपो हटवण्याची मागणी लवकरच पूर्ण केली जाईल, असा भरोसा त्यांनी दिला.




