महापालिकेला राज्य शासनाकडून 19.51 कोटींचा निधी

रखडलेल्या विकासकामांना मिळणार गती

* नगरविकास विभागाकडून आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी आर्थिक दिलासा

अमरावती /27 मार्च – आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या अमरावती महानगरपालिकेसाठी मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा मोठी दिलासादायक बातमी घेऊन आला आहे. आर्थिक वर्ष 2025-26 संपण्यास काहीच दिवस शिल्लक असताना, राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने महापालिकेसाठी 19 कोटी 51 लाख 46 हजार 584 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या मदतीमुळे पालिकेच्या आर्थिक स्थितीला मोठा आधार मिळणार असून प्रलंबित विकासकामांना गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, हा निधी तीन मुख्य शिर्षांतर्गत देण्यात आला आहे. यात एक टक्का मुद्रांक शुल्कापोटी 4 कोटी 21 लाख 60 हजार 342 रुपये मिळाले आहेत. तसेच 15 व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार पाणीपुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी 9 कोटी 17 लाख 21 हजार 745 रुपयांचा पहिला हप्ता मंजूर झाला आहे. याव्यतिरिक्त 6 कोटी 11 लाख 14 हजार 27 रुपयांचा निधी ’अनिर्बंध’ स्वरूपात देण्यात आला आहे, ज्याचा वापर महापालिका कोणत्याही अटीशिवाय गरजेनुसार करू शकणार आहे.
नगरविकास विभागाने संबंधित अधिकार्‍यांना हा निधी पीएफएमएस प्रणालीद्वारे तातडीने महापालिकेच्या खात्यात वर्ग करण्याचे निर्देश दिले आहेत. अमरावती महापालिका गेल्या काही वर्षांपासून गंभीर आर्थिक अडचणीत आहे. मर्यादित उत्पन्न आणि मालमत्ता करावरील अवलंबित्व यामुळे दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाले होते. अशा स्थितीत मिळालेली ही 20 कोटींची मदत पालिकेसाठी ’संजीवनी’ ठरणार आहे.
आर्थिक अडथळे दूर होणार- अमरावती महापालिकेला मिळालेल्या 19.51 कोटींच्या निधीमुळे पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनाचे प्रश्न सुटण्यास मदत होईल. मार्च अखेर निधी प्राप्त झाल्याने प्रशासकीय यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला असून विकासकामे मार्गी लागतील.

संबंधित बातम्या

Back to top button