बिबट पासून अमरावती शहरवासीयांचे संरक्षण करा

आ.सुलभा खोडके यांची विधिमंडळात मागणी

* वनविभागाला सुरक्षात्मक आदेश देऊ-वनमंत्री गणेश नाईक

मुंबई /25 मार्च – अमरावती शहरी भागात बिबट्याने संचार केल्याच्या घटना वारंवार समोर येत आहे. शहरालगत असलेल्या वडाळी वनपरिक्षेत्रातही बिबट्या शहरात भटकंती करत असल्याने वडाळी, विद्यापीठ, तपोवन परिसर , मंगलधाम परिसर, एसआरपीएफ कॅम्प, जुना बायपास भागातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. बिबट्या पासून मानवी जीवितास धोका पोहोचू नये म्हणून शासनाची काय उपाययोजना आहे ? व यासंदर्भात वनविभागाला निर्देशित करण्यात आले आहे का ? असा प्रश्न अमरावती विधानसभा मतदार संघाच्या आमदार आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी राज्यविधिमंडळातून उपस्थित केला. यावेळी आमदार सौ.सुलभाताई खोडके यांनी सभागृहासमक्ष सांगितले कि, अमरावती शहराच्या लगतच वडाळी वनपरिक्षेत्र व पोहरा जंगल असून या भागात बिबट्याच्या मोठा अधिवास आहे. या वनपरिक्षेत्रात बिबट सह इतरही वन्यजीव हे अन्न -पाणीच्या शोधात शहराकडे भटकंती करत असून त्यांनी रहिवाशी भागातील पाळीव जनावरे फस्त केल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. शहरालगतच्या वडाळी, विद्यापीठ, तपोवन परिसर, मंगलधाम परिसर , एसआरपीएफ कॅम्प , जुना बायपास भागात बिबट्याने शिरकाव केल्याचे सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. मंगलधाम परिसरात तर बिबट्याच्या दहशतीमुळे कुणीही सायंकाळी 6 नंतर घराबाहेर पडत नसून ऑटो -रिक्षा देखील मिळत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अमरावती शहरालगतच्या परिक्षेत्रातील बिबट्यांना वेळीच मज्जाव न घातल्यास ते शहराच्या मध्यवस्तीपर्यंत पोहोचतील, असे अनेकदा समोर आले आहे. दोन वर्षांपूर्वी बिबट्याने चक्क व्हीएमव्ही परिसर व पुंडलिकबाबा नगर , पाठपुस्तक मंडळ पर्यंत शिरकाव करून धुमाकूळ घातला होता. याबाबतसुद्धा आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी सभागृहाला अवगत करून वनमंत्री ना. गणेश नाईक यांचे लक्ष वेधले. बिबट्या शहरालगतच्या जंगल भागातून भटकंती करत अन्नाच्या शोधात शहरात येत असल्याने त्याच्या मूळ वास्तव्याच्या ठिकाणी म्हणजेच शहरालगतच्या जंगल भागाला चैनलिंग फेन्सिंग करणे आवश्यक आहे. अशी सुचना सुद्धा आमदार महोदयांनी सभागृहासमक्ष केली. याकडे सुद्धा गंभीरतेने लक्ष देण्याची गरज असल्याचे आमदार महोदयांनी सभागृहात सांगितले. पोहरा -वडाळी वनपरिक्षेत्रातील बिबट्या व अन्य वन्यजीव शहराकडे येणार नाही व वन्यजीवांपासून मानवी जीवितास धोका पोहोचवू नये , यासाठी कोणती कार्यवाही व उपाययोजना करण्यात आल्या ? तसेच वनविभागाला तसे दिशा निर्देश देण्यात आले का ? असा प्रश्न आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी विधानसभेतून उपस्थित केला.
यावर उत्तर देतांना राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सभागृहात सांगितले कि, महाराष्ट्र शासनाने वन्यजीव संरक्षण कायदा दुरुस्ती विधेयक विधानसभेत पारित केले असून यामध्ये वन्यजीवांच्या अधिवासाचे रक्षण जितके महत्वाचे आहेत, तितकेच मानवी जीवितास त्याचा धोका उद्भवू नये म्हणून प्रभावी खबरदारी व उपाययोजना करण्याचे सुद्धा तरतुदी आहेत. अमरावती शहरी भागात बिबट्याचा शिरकाव होऊ नये म्हणून वनविभागाला ठोस उपायोजना करण्याचे निर्देशित करणार असून सदस्यांच्या सुचने नुसार जिल्हा प्रशासन,लोकप्रतिनिधी , स्थानिक पोलीस यंत्रणा तसेच ग्रामीण प्रशासन या सर्वांना सोबत घेऊन तत्परतेने प्रभावी उपाययोजना करण्यासंदर्भात वन विभागाचा पुढाकार राहणार असल्याचे उत्तर मंत्री गणेश नाईक यांनी दिले. सदर भागातील वन परिक्षेत्रात बिबट सफारी, व्याघ्र सफारी , सीसीटीव्ही कॅमेरे आदीचा वॉच अशा विविध माध्यमातून बिबट्यांच्या हालचाली बाबत लक्ष देऊन उपद्रव रोखण्यासाठी सुद्धा उपाययोजना करण्याच्या सुचना स्थानिक वन विभागाला देणार असल्याचे वनमंत्री ना गणेश नाईक यांनी आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button