देश महासंकटात
गॅसची आयात 20 टक्क्यांनी घटली

* देशावर वीज टंचाईचे सावट; कारखाने बंद होण्याची भीती
* युद्धामुळे भारताचा इंधन पुरवठा विस्कळीत
नवी दिल्ली/19 मार्च : मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका आता थेट भारताच्या उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपला असून इराणने कतारमधील रास लाफान या मुख्य वायू निर्मिती केंद्रावर क्षेपणास्त्र हल्ला चढवला आहे. या भीषण हल्ल्यामुळे भारताचा 20 टक्के वायू पुरवठा अचानक ठप्प झाला असून देशातील वीज निर्मिती, खत कारखाने आणि मोठ्या उद्योगांचे चक्र थांबण्याची भीती निर्माण झाली आहे. जर हा पुरवठा पुढील दोन आठवड्यांत सुरळीत झाला नाही, तर देशाला मोठ्या आर्थिक मंदीचा आणि अंधाराचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा जाणकारांनी दिला आहे.
भारत आपल्या नैसर्गिक वायूच्या गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर कतारवर विसंबून आहे. रास लाफान प्रकल्पावर झालेल्या हल्ल्यामुळे भारताला दररोज मिळणारा सुमारे 47.4 दशलक्ष टन वायू पुरवठा अचानक बंद पडला आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेत इंधनाचे भाव कडाडले असून भारताच्या तिजोरीवर मोठा आर्थिक बोजा पडणार आहे. सध्या देशात घरगुती गॅसचा तुटवडा जाणवत असतानाच आता सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सर्वसामान्य ग्राहकांसाठी घरगुती गॅस आणि वाहनांसाठीचा इंधन पुरवठा चालू ठेवण्याकरिता सरकार आता इंधन वाटपाचे नवीन धोरण राबवण्याची शक्यता आहे. या टंचाईचा सर्वाधिक फटका वीज केंद्रांना बसणार असल्याने अनेक राज्यांत वीज कपातीची टांगती तलवार आहे. घरगुती पुरवठा टिकवण्यासाठी कारखान्यांचा वायू पुरवठा कमी केला जाण्याचे संकेत मिळाल्याने वस्तूंचे भाव वाढून महागाई वाढण्याची शक्यता आहे. होर्मुझची सामुद्रधुनी युद्धाच्या छायेखाली असल्याने सागरी वाहतूक धोक्यात आली असून विमा कंपन्यांनीही त्यांचे दर वाढवले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केंद्र सरकारने आता रशिया, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिका यांसारख्या देशांकडून तातडीने वायू मिळवण्यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्न वेगवान केले आहेत.
सामुद्रधुनी बनली रणांगण-होर्मुझची सामुद्रधुनी युद्धाच्या विळख्यात अडकल्याने जागतिक तेल आणि वायू वाहतूक धोक्यात आली आहे. जहाजांवरील धोक्यामुळे वाहतुकीचे दर गगनाला भिडले असून भारताने आता रशिया आणि अमेरिकेकडून तातडीने मदत मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.




