आयुक्त सौम्या शर्मा यांना मनपाच्या बजेटचा फोकस विचारला
हॅलो, मॅडम मी संपादक बोलतो आहे...

प्रशासकीय कारवाई कधी करणार विचारले
अमरावती / 19 मार्च – महानगर पालिकेचे सर्वोच्च पदाधिकारी असलेले महापौर हे आज एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाले. श्रीचंद तेजवानी यांनी आज ‘मंडल मीडिया हाऊस’चे संपादक म्हणून सूत्रे हाती घेत प्रशासनावर प्रश्नांची जोरदार बॅटिंग केली. विशेष म्हणजे, त्यांनी त्यांच्याच कार्यालयातील महानगरपालिका आयुक्त श्रीमती सौम्या शर्मा-चांदक यांना थेट फोन लावून विविध नागरी प्रश्नांवर जाब विचारला.
आयुक्तांना महापौरांचा फोन येणे ही तशी सरावातील गोष्ट असली, तरीही यावेळी मात्र ‘गेस्ट एडिटर महापौर’ असे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तेजवानी म्हणाले की, मी सध्या आपल्याशी महापौर म्हणून संपर्क करत नसून, एक संपादक म्हणून बोलत आहे. मला आपल्याकडून काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत. संपादक तेजवानी यांनी पहिला प्रश्न विचारला की, महानगरपालिकेने अलीकडेच स्थायी समिती सभापतींकडे बजेट सादर केले आहे. या बजेटमध्ये प्रशासनाने नेमक्या कोणत्या गोष्टींवर अधिक फोकस केला आहे? या थेट प्रश्नावर उत्तर देताना आयुक्त सौम्या शर्मा यांनी बजेटमधील ठळक गोष्टींची यादीच वाचून दाखवली. आयुक्तांनी स्पष्ट केले की, आमचा अधिक भर शाळा आणि आरोग्य सुविधांवर आहे. त्याचसोबत ‘ई-गव्हर्नन्स’वर आम्ही विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नागरिकांना ऑनलाईन माध्यमांतून सर्व सेवा आणि सुविधा सहज उपलब्ध झाल्या पाहिजेत, हा या बजेटचा मुख्य उद्देश आहे. शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी तसेच शहराच्या सौंदर्यीकरणासाठीही बजेटमध्ये विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतर संपादक तेजवानी यांनी कचरा निर्मूलनाचा मुद्दा उपस्थित केला. महापौरांनी यापूर्वी यासाठी विशेष सभा बोलावली होती, त्याकडे लक्ष वेधत त्यांनी विचारले की, कचरा निर्मूलन विशेष सभेमध्ये जे मुद्दे चर्चिले गेले, त्याबाबत प्रशासनाने काही ठोस नियोजन केले आहे का? यावर आयुक्त म्हणाल्या की, आम्ही त्यादृष्टीने पूर्ण प्रयत्न करत आहोत. आमसभेत नगरसेवकांकडून ज्या सूचना प्राप्त झाल्या आहेत, त्यावर सध्या कार्यवाही सुरू आहे. कायम सफाई कामगारांच्या बाबतीत त्यांचे निरीक्षण आणि पर्यवेक्षण सुरू असून, त्यातून चांगल्या निकालाची आम्हाला अपेक्षा आहे. कंपनीसोबत झालेल्या अॅग्रीमेंटला सर्वांनी सहकार्य करावे, असे आम्हाला वाटते. मुलाखतीच्या शेवटी संपादकांनी सध्या वर्तमानपत्रांत गाजत असलेला आरोग्य निरीक्षकांच्या बदल्यांचा मुद्दा उपस्थित केला. आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत का? असा थेट प्रश्न संपादकांनी केला, ज्यावर आयुक्तांनी हो, हे खरे आहे, असे उत्तर दिले. त्यावर प्रतिप्रश्न करताना तेजवानी म्हणाले की, काही आरोग्य निरीक्षक अद्याप बदलीच्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत, अशांवर आपण काय कारवाई करणार आहात? यावर कडक भूमिका घेत आयुक्तांनी सांगितले की, मी या संपूर्ण प्रकरणाचा विभागाकडून अहवाल मागवला आहे. जे कर्मचारी बदलीच्या ठिकाणी अद्याप रुजू झालेले नाहीत, त्यांच्यावर निश्चितपणे कडक कारवाई केली जाईल. अशा प्रकारे संपादक श्रीचंद तेजवानी यांनी प्रश्नांच्या माध्यमातून प्रशासनाला बोलते करत एक वेगळाच अनुभव सर्वांना दिला.




