वि.सा.संघावर डॉ.गिरीश गांधींची सत्ता
व.सा.संघाच्या कार्यकारिणीत मटाचे संपादक श्रीपाद अपराजीत

* अमरावतीच्या डॉ. शोभा रोकडे निर्वाचित
* पत्रकार बाळ कुळकर्णी, शेफ विष्णू मनोहरही विजयी
* विदर्भ साहित्य संघाची 14 जानेवारी 1923 रोजी अण्णासाहेब खापर्डेंनी अमरावतीत स्थापना केली
अमरावती /16 मार्च – विदर्भाच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्राचे वैभव असलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीचा निकाल अखेर लागला असून, माजी आमदार डॉ. गिरीश गांधी यांनी मोठे बहुमत मिळवून अध्यक्षपदावर बाजी मारली आहे. तब्बल 20 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर ही निवडणूक झाल्यामुळे संपूर्ण विदर्भातील लोकांचे याकडे लक्ष लागले होते. साहित्याच्या या दरबारात यंदा राजकारणाचे रंगही चांगलेच मिसळले होते, पण शेवटी मतदारांनी गिरीश गांधींच्या नेतृत्वावर आपला विश्वास दाखवला. 14 जानेवारी 1923 रोजी अमरावतीला अण्णासाहेब खापर्डे यांनी या संस्थेचे रोपटे लावले होते. या संस्थेचे पहिले अध्यक्ष हैदराबादचे न्यायमूर्ती केशवराव कोरटकर हे होते. पुढे 1950 मध्ये या संस्थेचे मुख्य कार्यालय नागपूरला हलवण्यात आले. मराठी भाषा, तिचे साहित्य आणि आपली संस्कृती जपण्याचे मोठे काम ही संस्था गेल्या शंभर वर्षांपासून करत आहे. नागपूरसह खामगाव, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशीम आणि अमरावती अशा शहरांमध्ये संघाच्या 59 शाखा पसरलेल्या आहेत. या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत डॉ. गिरीश गांधी यांनी आपल्या चारही प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. गांधी यांना 2661 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी श्रीपाद जोशी यांना 701, प्रदीप दाते यांना 1187, रंजन दारव्हेकर यांना 114 आणि रवींद्र शोभणे यांना केवळ 205 मते मिळाली. अध्यक्षपदासोबतच 22 कार्यकारी सदस्यांची निवडही करण्यात आली. यामध्ये गांधी पॅनलने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. ’महाराष्ट्र टाइम्स’चे नागपूरचे संपादक श्रीपाद अपराजित विजयी झाले तसेच अमरावतीच्या डॉ. शोभा रोकडे या कार्यकारी सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. अपराजित यांना 2480 तर डॉ. रोकडे यांना 2462 मते मिळाली. विशेष म्हणजे डॉ. शोभा रोकडे या सध्या अमरावती शाखेच्या उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. या निवडणुकीत ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांनी 2549 मते मिळवून तर प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी 2679 मते मिळवून मोठा विजय मिळवला. इतर विजयी उमेदवारांमध्ये अनिल इंदाणे (2278), लखनसिंह कटरे (2384), विजय गुणेवार (2127), विवेक कडूकर (2070), अमर कुलकर्णी (2138), डॉ. जयश्री कुलकर्णी (2353), अजय गोपाळवार (2499), पराग घोंगे (2512), आसावरी तिडके (2370), श्याम धोंड (2124), डॉ. देवेंद्र पुनसे (2255), शुभदा फडणवीस (2758), संदीप वराडकर (2429), स्वाती मोहरील (2377), चंद्रकांत लाखे (2280), शेख इरफान इक्बाल (2090), अरुणा सबाने (2495) आणि माधुरी साकुळकर (2274) यांचा समावेश आहे. प्रदीप दाते यांच्या पॅनलमधून केवळ श्रीपाद अपराजित हेच निवडून येऊ शकले, बाकी सर्व जागांवर गांधी पॅनलने बाजी मारली. ही निवडणूक यंदा अनेक कारणांनी गाजली. मतदार याद्या आणि मतदान प्रक्रियेवरून मोठा वाद झाला होता, अगदी लवादाकडेही धाव घेतली होती. मतपत्रिका पळवल्याचे आरोप झाले आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नावही या वादात ओढले गेले. गिरीश गांधी हे एकेकाळी नितीन गडकरींचे शिक्षक राहिले आहेत, त्यामुळे त्यांच्या नात्याची चर्चा गावखेड्यापर्यंत रंगली होती. काही उमेदवारांनी असा आरोप केला होता की, भाजपचे नेते आणि कार्यकर्ते या निवडणुकीत हस्तक्षेप करत आहेत. श्रीपाद जोशी यांनी तर गडकरींना पत्र लिहून त्यांची भूमिका स्पष्ट करायला सांगितली होती. त्यावर गडकरींनी पत्राद्वारे उत्तर देऊन सांगितले की, निवडणूक न होता ही निवड सामोपचाराने व्हायला हवी होती आणि माझा या निवडणुकीशी थेट संबंध नाही. मात्र, विद्यमान अध्यक्ष प्रदीप दाते यांनी आरोप केला की भाजपचे कार्यकर्ते प्रत्यक्ष मैदानात उतरून मतपत्रिकांचे गट्टे गोळा करत आहेत. या सगळ्या गोंधळामुळे निवडणुकीला राजकीय वळण मिळाले होते. साहित्य संघाने 7493 मतदारांना टपालाने मतपत्रिका पाठवल्या होत्या, पण पत्त्यांमधील चुकांमुळे 2007 पत्रिका परत आल्या. शेवटी 4935 मतदारांनी आपला हक्क बजावला. डॉ. गिरीश गांधी यांच्या विजयामुळे साहित्य संघाला आता एक चैतन्यदायी नेतृत्व मिळाले आहे, असे मानले जात आहे. त्यांचा सामाजिक क्षेत्रातील दांडगा अनुभव आणि सर्वपक्षीय लोकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध या विजयात महत्त्वाचे ठरले. निवडणुकीत त्यांच्यावर अनेक आरोप झाले, पण त्यांनी शांत राहून संयम पाळला, ज्याचे कौतुक सर्वत्र होत आहे. गेल्या 20 वर्षांपासून निवडणुका टाळल्या जात होत्या, त्यामुळे जुनी मंडळी या निवडणुकीसाठी तयार नव्हती. नेहमीप्रमाणे बिनविरोध निवड होईल असे वाटत होते, पण काही चक्रं फिरली आणि प्रत्यक्ष मतदान झाले. विजयानंतर बोलताना गिरीश गांधी म्हणाले की, साहित्य संघाच्या परंपरा आम्ही जपणार आहोत आणि जिथे गरज आहे तिथे प्रशासनात नक्कीच बदल करू. या निवडणुकीच्या प्रचाराची सर्व सूत्रे पत्रकार बाळ कुळकर्णी आणि लेखिका अरुणा सबाने यांनी सांभाळली होती. आता नव्या जोमाने ही संस्था विदर्भाच्या साहित्याला नवी दिशा देईल, अशी अपेक्षा सर्वजण व्यक्त करत आहेत.




