शिवसेना पक्ष अन् चिन्ह कुणाचं?
सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली

नवी दिल्ली/12 मार्च – सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावरील वादाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही गटांचा अंतिम युक्तिवाद पुढील तारखेला ऐकला जाईल असे स्पष्ट केले. मात्र पुढील सुनावणीची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. सुनावणीदरम्यान उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून अंतिम युक्तिवादासाठी तयारी दर्शवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंकडून सादर करण्यात आलेले लेखी युक्तिवाद पाहून पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली जाईल असे सांगितले आहे.
शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून हा वाद गेल्या तीन वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित आहे. 2022 मध्ये शिवसेनेत मोठी फूट पडली, जेव्हा एकनाथ शिंदे यांनी पक्षातील सुमारे 40 आमदारांसह बंडखोरी केली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्याने नवीन सरकार स्थापन केले.




