लोकसभेचा ओम बिर्लांवर विश्वास

अध्यक्षांविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला

विरोधकांचा गोंधळ, सभागृहाचे कामकाज स्थगित

नवी दिल्ली/11 मार्च  : लोकसभेत विरोधकांनी लोकसभा अध्यक्षांविरुद्ध आणलेला अविश्वास प्रस्ताव आज जोरदार गदारोळात फेटाळण्यात आला. पीठासीन अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी हा प्रस्ताव फेटाळल्याची घोषणा केली. दरम्यान, या प्रस्तावावरील चर्चेवेळी गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली, ज्यावरून सभागृहात अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला.
गृहमंत्री अमित शाह भाषणासाठी उभे राहिल्यावर विरोधकांनी घोषणाबाजी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. शाह यांच्या वक्तव्याचा निषेध करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी त्यांनी माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. अध्यक्षांविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळल्यानंतर पीठासीन अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी लोकसभेचे कामकाज गुरुवार सकाळी 11 वाजेपर्यंत स्थगित केले.
विरोधकांचा गोंधळ वाढत असताना जगदंबिका पाल यांनी सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, विरोधक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून तुम्हाला सत्य ऐकायचे नाहीये, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना फटकारले. विरोधकांच्या गदारोळातही अमित शाह यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. डोकलाम वादाच्या वेळी काँग्रेस नेते चीनला गेले होते आणि चिनी दूतावासात गुप्त बैठका घेत होते. काँग्रेसनेच अक्साई चीनचा भाग चीनला दिला, असा गंभीर आरोप शाह यांनी यावेळी केला.
गृहमंत्र्यांचे भाषण पूर्ण होईपर्यंत सभागृहाची वेळ वाढवण्याचा प्रस्ताव पीठासीन अध्यक्षांनी मांडला. यावेळी विरोधकांनी गृहमंत्र्यांनी असंसदीय भाषा वापरल्याचा आरोप केला. यावर प्रत्युत्तर देताना शाह म्हणाले, माझ्या भाषणात कोणताही असंसदीय शब्द असेल तर तो कामकाजातून काढून टाकावा. अमित शाह यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, राहुल गांधी महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलतच नाहीत. 17 व्या लोकसभेत त्यांची उपस्थिती केवळ 51 टक्के होती. जेव्हा बजेट सत्र किंवा इतर महत्त्वाचे प्रसंग असतात, तेव्हा ते परदेशात असतात. अनेक महत्त्वाच्या विधेयकांवरील चर्चेवेळी ते सभागृहात अनुपस्थित असतात.

संबंधित बातम्या

Back to top button