मनपाच्या अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी सूचना द्याव्यात
लोकसहभागातून घडणार अमरावतीचा विकास आराखडा

* महापौर श्रीचंद तेजवाणी यांचे आवाहन
अमरावती /10 मार्च : अमरावती महानगरपालिकेच्या सन 2026-27 च्या आगामी अर्थसंकल्पाची तयारी आता वेगाने सुरू झाली असून, शहराच्या विकासाची दिशा ठरवण्यासाठी महापौरांनी एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शहराचा विकास केवळ प्रशासकीय आकड्यांवर अवलंबून न राहता तो थेट नागरिकांच्या सूचनांनुसार व्हावा, या उदात्त हेतूने महापौर श्रीचंद तेजवानी यांनी तमाम अमरावतीकरांना आपले मत आणि अपेक्षा नोंदवण्याचे जाहीर आवाहन केले आहे. लोकसहभागातून आकाराला येणारा हा अर्थसंकल्प शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एक मैलाचा दगड ठरेल, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महापौरांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, महानगरपालिकेचा हा अर्थसंकल्प केवळ एक आर्थिक दस्तऐवज नसून तो अमरावतीच्या उज्ज्वल भविष्याचा आराखडा आहे. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि उद्याने यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी नागरिकांचे अनुभव मोलाचे ठरणार आहेत. विशेषतः तरुण पिढी, विद्यार्थी, कल्पक उद्योजक, गृहिणी आणि अनुभवी ज्येष्ठ नागरिकांनी या प्रक्रियेत हिरिरीने सहभागी होऊन आपल्या परिसरातील समस्यांवर प्रभावी उपाय सुचवावेत, अशी साद त्यांनी घातली आहे. शहराला अधिक देखणे, आधुनिक आणि राहण्यायोग्य बनवण्यासाठी नागरिकांचा हा सक्रिय सहभाग प्रशासनासाठी दिशादर्शक ठरणार आहे.सूचना नोंदवण्यासाठी महापालिकेने ’क्यूआर कोड’ आणि ‘amravati corporation.in’ हे अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. नागरिकांकडून प्राप्त होणार्या प्रत्येक विधायक सूचनेचा विचार अर्थसंकल्पात तरतूद करताना केला जाईल. या महत्त्वाच्या प्रसंगी उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, पक्षनेते चेतन गावंडे, गटनेते डॉ. राजेंद्र तायडे, नाना आमले, नगरसेवक संजय नरवणे, संजय गव्हाळे, रावसाहेब देशमुख, तांत्रिक व्यवस्थापक अमित डेंगरे आणि सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




