टीम इंडिया ‘विश्वविजेता’
न्यूझीलंडचा 96 धावांनी धुव्वा

* संजू सॅमसनची 89 धावांची विक्रमी खेळी
* जसप्रीत बुमराह ’प्ले.यर ऑफ द मॅच’
अहमदाबाद /8 मार्च : जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारतीय क्रिकेटच्या सुवर्णकाळाचा नवा अध्याय लिहिला गेला. टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम महायुद्धात भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत विश्वविजेतेपदावर तिसर्यांदा आपले नाव कोरले आहे. 2007 आणि 2024 च्या यशानंतर आता 2026 मध्येही तिरंगा डौलाने फडकला असून, सूर्यकुमार यादवचे नाव आता विश्वविजेत्या कर्णधारांच्या यादीत सुवर्ण अक्षरांनी नोंदवले गेले आहे. या हाय-व्होल्टेज लढतीत यजमान भारताने प्रथम फलंदाजी करताना 255/5 असा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात किवी संघाचा डाव 19 व्या षटकात अवघ्या 159 धावांत आटोपला. यासह सलग दोनदा विश्वविजेतेपद पटकावणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.न्यूझीलंडच्या डावातील 19 व्या षटकात अभिषेक शर्माने टाकलेल्या सहाव्या चेंडूवर भारताच्या विजयावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले. जॅकब डफीने मारलेला हवेतील फटका लाँग-ऑन सीमारेषेवर उभ्या असलेल्या टिळक वर्माने अत्यंत चपळाईने टिपला. सीमारेषेच्या अगदी जवळ असल्याने स्वतःचा तोल सावरण्यासाठी टिळकने चेंडू हवेत उडवला आणि मैदानाच्या आत पुन्हा तो सुरक्षित झेलला. डफी बाद होताच अहमदाबादचे मैदान ’इंडिया-इंडिया’च्या जयघोषाने दुमदुमले आणि भारतीय खेळाडूंनी मैदानावरच जल्लोष सुरू केला.क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही देशाला 3 वेळा टी-20 विश्वचषक जिंकता आलेला नव्हता. ही ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिलाच संघ ठरला आहे.
यजमान विजेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात : ’यजमान देशाला मायदेशात विश्वचषक जिंकता येत नाही’ हा प्रदीर्घ काळ चालत आलेला समज भारताने आज मोडीत काढला. मायदेशातील चाहत्यांच्या साक्षीने हा पराक्रम करून टीम इंडियाने ऐतिहासिक पराक्रमाची नोंद केली आहे.



