खुनाचा गुन्हा लपविण्यासाठी अमर व्यासची हत्त्या
हत्याकांडात आरोपींचा ’डबल गेम’ उघड

* गुन्हे शाखेने उधळला खुन्यांचा फिल्मी बनाव
अमरावती / 5 मार्च – व्याजाच्या किरकोळ पैशांसाठी एका तरुणाचा काटा काढल्यानंतर, पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी आरोपींनी चक्क 24 तासांच्या आत दुसरी हत्या केल्याचा थरार अमरावतीत समोर आला आहे. पहिल्या खुनाचा गुन्हा लपवण्यासाठी मुद्दाम दुसरा गुन्हा करून तुरुंगात आश्रय घेण्याचा ’फिल्मी’ डाव मुख्य आरोपी आदेश तेलमोरे आणि त्याच्या टोळीने रचला होता. मात्र, तांत्रिक पुरावे आणि गुन्हे शाखेच्या चातुर्यामुळे या खुन्यांची हुशारी मातीत मिसळली असून, एका हत्येच्या तपासात दुसर्या हत्येचे गुपित उघड झाले आहे.
महादेव खोरीतील अमर मोतीलाल व्यास याने कुख्यात गुन्हेगार आदेश तेलमोरेकडून 3 हजार रुपये उसने घेतले होते. ही रक्कम परत देण्यास टाळाटाळ केल्याने चिडलेल्या आदेशने अमरचा गेम करण्याचा कट रचला. 10 फेब्रुवारी रोजी संजय गायकवाडच्या मदतीने अमरला दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावून छत्री तलाव परिसरात नेण्यात आले. तिथे आदेशसह गौरव गजभिये, जय कोकाटे, निश्चय पोटफोडे, संजय वानखडे, रोहित तायडे आणि तुषार सुपनर यांनी अमरला बेदम मारहाण केली. आईकडून पैसे मागवूनही आरोपींचे मन भरले नाही. आदेशने सुर्याने अमरच्या जांघेवर वार करून त्याला जिवंतपणीच विहिरीत ढकलून दिले. ही हत्या जगासमोर येऊ नये म्हणून आरोपींनी 11 फेब्रुवारीला नांदगाव पेठ परिसरात मुद्दाम वाहन आडवे लावण्यावरून वाद उकरून काढला. त्यात गौरव घोटकर या तरुणाची हत्या करून हे सर्वजण तुरुंगात जाऊन बसले. त्यांना वाटले की, अमरचा मृतदेह सापडेल तेव्हा आपण तुरुंगात होतो हा पुरावा आपल्याला वाचवेल. पण पोलिसांनी अमरचा फोन, कॉल डिटेल्स आणि शवविच्छेदन अहवालातील तारखांची जुळवाजुळव केली आणि हा सगळा बनाव उघडा पाडला. पोलिसांनी या प्रकरणी आदेश तेलमोरे, रोहित तायडे आणि यशोदीप बेलकर यांच्यासह इतर आरोपींना ताब्यात घेतले असून, एकाचा शोध सुरू आहे.
चलाख आरोपी अन् पोलिसांचा इंगा
अमर व्यासचा फोन लंपास करून आरोपींनी तो एका महामार्गावरून जाणार्या वाहनात फेकला होता, जेणेकरून पोलिसांना त्याचे ठिकाण दुसरीकडेच असल्याचे वाटावे. कोणतीही सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसताना, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण आणि त्यांच्या पथकाने केवळ गुप्त माहितीच्या आधारे ही साखळी जोडली. खुनावर खून करून कायद्याला खेळवणार्या या टोळीचा डाव पोलिसांनी अखेर उधळून लावला.




