लाईनमन हा महावितरणचा खरा प्रकाशदूत
मुख्य अभियंता, अशोक साळुंके यांचे प्रतिपादन

* लाईनमन दिनानिमित्त परिमंडळातील लाईनमनच्या कार्याचा गौरव’
अमरावती /5 मार्च : जनसामान्यात लाईनमन म्हणून परिचित असलेला महावितरणचा जनमित्र हा वादळ, वारा, ऊन पाऊस कशाचीही तमा न बाळगता रात्र – दिवस सुरळीत सेवा देण्यासाठी काम करत, असून तो महावितरणचा खरा प्रकाशदूत आहे, असे प्रतिपादन मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी केले.
लाईनमनच्या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अमरावती परिमंडळात 4 मार्च हा लाईनमन दिवस सर्व विभागीय कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. डफरीन कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्य अभियंता बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंता दिपक देवहाते, दीपाली माडेलवार, कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे, उपविधी अधिकारी प्रशांत लहाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरक्षेची शपथ घेवून सुरू करण्यात आलेल्या कार्यक्रमात जनमित्रांच्या कामाचा गौरव करतांना मुख्य अभियंता म्हणाले की, महावितरणचा लाईनमन केवळ सुरळीत वीज पुरवठ्यासाठीच नाही, तर वीज बिल वसूली, वीज जोडणी देणे, थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करणे, वीज चोरी पकडणे, वितरण हानी कमी करण्यासाठी काम करणे इत्यादी अश्या अनेक पैलूवर काम करत असून प्रशासन अत्यंत महत्वाच्या असलेल्या या घटकाच्या पाठीशी नाही तर सोबत असल्याचे ते म्हणाले. तसेच प्रचंड क्षमता असलेल्या परिमंडळातील जनमित्रांनी आगामी काळात शंभर टक्के योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. महावितरणमध्ये काम करतांना चुकीला माफी नाही, महावितरणचा जनमित्र महावितरणसाठी, वीज ग्राहकासाठी जेवढा महत्वाचा आहे, त्यापेक्षाही जास्त महत्वाचा तो त्यांच्या कुटूंबासाठी आहे. त्यामुळे वीज यंत्रणेवर काम करतांना न चुकता सुरक्षा साधनांचा वापर करूनच काम करावे असे भावनिक आवाहनही मुख्य अभियंता यांनी केले. कार्यक्रमादरम्यान मुख्य अभियंता आणि प्रमुख उपस्थितांच्या हस्ते सुरक्षेकरीता टाँग टेस्टर जनमित्रांना देण्यात आले.




