सीताबाई संगई शाळेतील कस्टडीरूम मधून इंग्रजीच्या उत्तरपत्रिकेची चोरी

गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडेला अटक, उपपरीरक्षक अभ्यंकर फरार

उपशिक्षणाधिकार्‍यांच्या भरारी पथकामुळे बिंग फुटले, शिक्षण क्षेत्र हादरेल

अंजनगाव सुर्जी 1 मार्च  : रक्षकच जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा व्यवस्थेचा कणा कसा मोडतो, याचा संतापजनक प्रत्यय अंजनगाव सुर्जी येथे आला आहे. दहावीच्या परीक्षेत चक्क उत्तरपत्रिका चोरून ’निकालाचा बाजार’ मांडणार्‍या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून, पोलिसांनी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे याला बेड्या ठोकल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड मानला जाणारा शिक्षण उपपरीक्षक सुशील अभ्यंकर हा पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांनी जाळे विणले आहे. अमरावती जिल्ह्याच्या शैक्षणिक इतिहासाला काळिमा फासणार्‍या या ’पेपरफुटी’च्या धक्क्याने संपूर्ण प्रशासन हादरून गेले असून, भ्रष्ट अधिकार्‍यांच्या या करामतीने लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर टांगती तलवार निर्माण केली आहे.
अंजनगाव सुर्जी येथील सिताबाई संगई विद्यालयातील परीक्षा केंद्रावर मंगळवारी इंग्रजी विषयाचा पेपर सुरू असताना हा काळा कारनामा शिजला. सकाळी 11 वाजता पेपर सुरू झाला, हजारो विद्यार्थी घाम गाळून उत्तरे लिहीत होते, मात्र पडद्यामागे काही ’पांढरपेशी’ अधिकारी निकालाचा निकाल लावण्याची तयारी करत होते. दुपारी 2.10 वाजता पेपर संपल्यानंतर जेव्हा उत्तरपत्रिकांची मोजणी झाली, तेव्हा दोन उत्तरपत्रिका गायब असल्याचे समोर आले. केंद्र संचालकांचे धाबे दणाणले आणि शोधाशोध सुरू झाली. याच दरम्यान, केंद्रावर घुटमळणारा अनिल हाडोळे नावाचा खाजगी इसम पोलिसांच्या रडारवर आला. त्याची झडती घेतली असता, त्याच्या विजारीच्या खिशात घड्या घातलेल्या दोन उत्तरपत्रिका लपवून ठेवल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले. हा प्रकार उघड होताच परीक्षा केंद्रावर जणू बॉम्ब फुटला आणि वरिष्ठ अधिकार्‍यांनी तातडीने धाव घेतली. अमरावतीच्या माध्यमिक उपशिक्षणाधिकारी रजनी नारायण शिरभाते यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. प्राथमिक तपासात हे केवळ एका इसमाचे कृत्य नसून, यामध्ये उच्चपदस्थ अधिकार्‍यांचे मोठे संगनमत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सुधीर खोडे याला अटक केली, मात्र सुशील अभ्यंकर हा कारवाईची कुणकुण लागताच फरार होण्यात यशस्वी झाला. या टोळीने दोन अनोळखी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका लंपास करून त्या बाहेर लिहून घेण्याचा कट रचल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी भादंवि कलम 316(5), 318(3)(4), 61(2)(ए) आणि महाराष्ट्र परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील पोरगा वर्षभर मेहनत करतो आणि दुसरीकडे हे ’शिक्षण तस्कर’ चक्क परीक्षेचाच लिलाव मांडतात, यामुळे पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
विजारीच्या खिशात लपवले विद्यार्थ्यांचे भविष्य! -केवळ दोन उत्तरपत्रिका गायब होणे, हा साधा निष्काळजीपणा नसून तो एका मोठ्या रॅकेटचा भाग आहे. खाजगी व्यक्तीचा परीक्षा केंद्रात मुक्त संचार असणे आणि त्याच्या खिशात उत्तरपत्रिका सापडणे, हे गटशिक्षणाधिकार्‍यांच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही. ही चोरी केवळ कागदाची नव्हती, तर ती गुणवंत विद्यार्थ्यांच्या हक्काची होती. या प्रकरणातील दोन अनोळखी विद्यार्थी नेमके कोण आहेत आणि त्यांच्यासाठी ही रिस्क कोणी घेतली, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

आरोपी कितीही मोठा असो, सोडणार नाही!

आम्ही या प्रकरणाचा तपास युध्दपातळीवर सुरू केला आहे. शिक्षण क्षेत्राला लागलेली ही वाळवी समूळ नष्ट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. फरार आरोपी सुशील अभ्यंकर याला शोधण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. लवकरच त्यालाही बेड्या ठोकल्या जातील. न्यायालयाकडे आम्ही आरोपींची पोलीस कोठडी मागणार आहोत, जेणेकरून या घोटाळ्याचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहचले आहेत, याचा खुलासा होईल. प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या कष्टाशी खेळणार्‍यांना कायद्याचा हिसका दाखवला जाईल.
-सुरज बोंडे (पोलीस निरीक्षक, अंजनगाव सुर्जी)

संबंधित बातम्या

Back to top button