पर्यावरणपूरक होळी साजरी करा
निसर्गरक्षणाची सामूहिक जबाबदारी, प्रभात निसर्ग संस्कार मंडळाचे आवाहन

अमरावती /1 मार्च : होळी हा आनंद, एकोपा आणि सामाजिक सलोख्याचा सण आहे. मात्र या उत्सवात पर्यावरणाचे भान राखणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट करत स्थानिक खोलापुरी गेट येथील प्रभात एज्युकेशन सोसायटी संचलित प्रभात निसर्ग संस्कार मंडळाच्या वतीने नागरिकांना पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे ठाम व आग्रहपूर्वक आवाहन करण्यात आले आहे.
सण साजरा करताना निसर्गाची हानी होणार नाही, याची प्रत्येकाने जबाबदारी घ्यावी, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. होळी पेटविताना हिरवी, ओली झाडे किंवा त्यांच्या फांद्या तोडू नयेत. प्लास्टिक, रबर अथवा इतर घातक कचरा जाळणे टाळावे, कारण त्यामुळे विषारी धूर निर्माण होऊन पर्यावरण व आरोग्यावर दुष्परिणाम होतात. नागरिकांनी स्वच्छ, सुरक्षित आणि मर्यादित साधनांमध्ये होळी साजरी करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रंगपंचमीच्या निमित्ताने सर्वांनी जात, धर्म, पंथ यांचे भेद विसरून रंगोत्सव साजरा करावा; मात्र रासायनिक व त्वचेला अपायकारक रंगांना दूर ठेवावे. नैसर्गिक फुले, पाने व हळद-चंदनापासून तयार केलेले रंग वापरण्यावर भर द्यावा. शक्यतो नैसर्गिक गुलालाचा कोरड्या स्वरूपात वापर केल्यास त्वचेचे संरक्षण होईल आणि पाण्याचीही बचत होईल. जलस्त्रोत, विहिरी, तलाव यामध्ये कोणतेही रासायनिक रंग टाकू नयेत, जेणेकरून मुक्या जीवांना तसेच नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही, अशी सूचनाही मंडळाने केली आहे. आनंद साजरा करताना निसर्ग वाचवा हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रभात निसर्ग संस्कार मंडळाचे अध्यक्ष एल. के. व्ही. पवार, वि. दा. पवार, माधुरी नेरकर, अशोक पांडे, नरेंद्र पाटणे, सुरेंद्र धामणकर, गजानन माहुलकर, संजय वाघुळे तसेच विदर्भ पर्यावरण परिषदच्या कविता पवार, वैशाली कांडलकर, रोझीना शेख, झाकीर कुरेशी आदी पदाधिकार्यांनी केला आहे.




