100 कोटींची महापालिकेची नवीन इमारत, शासनाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी

नवीन टाऊन हॉल बांधणार

* नेहरू मैदानात पार्कींग, बगिचाही

* मनपाच्या शाळा सुधारणार

* कचर्‍याची समस्या सुटणार

* उपमहापौर सचिन भेंडे यांची दमदार मुलाखत

अमरावती/23 फेब्रुवारी  – अमरावती महानगरपालिकेची नवी इमारत नवे तहसील कार्यालय आणि आयटीआय यांच्या मधील जागेत बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून या इमारतीच्या बांधकामासाठी तब्बल 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती नवनिर्वाचित उपमहापौर सचिन भेंडे यांनी मुलाखतीदरम्यान दिली. राजकीय विश्लेषक माधव पांडे यांच्याशी झालेल्या दिलखुलास संवादात उपमहापौरांनी शहरातील विविध समस्यांवर रोखठोक मते मांडली. अवघ्या महिनाभरात अमरावतीकरांना भेडसावणार्‍या सर्व प्रश्नांवर विचारविनिमय करून कामाला सुरुवात केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उपमहापौरांनी मुलाखतीत शहरातील अनेक महत्त्वाच्या मुद्यांना स्पर्श केला. येत्या अर्थसंकल्पात अमरावतीसाठी भरघोस निधी मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मोर्शी रोडकडे जाणार्‍या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनासमोरील शासकीय जागेवर पूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी यांचे निवासस्थान होते. आता त्या सुमारे दीड एकर जागेवर नव्या महापालिका भवनाची इमारत उभारण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी या प्रस्तावासाठी पुढाकार घेतला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाल्याचे उपमहापौरांनी सांगितले. अमरावती शहरातील राजकमल चौकातील महानगरपालिकेचा टाऊन हॉल सध्या जीर्ण अवस्थेत असून तो नागरिकांच्या उपयोगाचा राहिलेला नाही. त्यामुळे नवा टाऊन हॉल उभारण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच त्या जागेवर व्यावसायिक संकुल (कमर्शियल मार्केट) उभारण्याचाही प्रस्ताव आहे. नेहरू मैदानाच्या जागेवर पार्किंगची सुविधा विकसित करण्याची योजना असून शहीद स्मारकाजवळील उद्यान अधिक विकसित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर अधिक काम करण्याची गरज असल्याचे उपमहापौरांनी स्पष्ट केले. एका प्रश्नाला उत्तर देताना सचिन भेंडे म्हणाले की, आम्ही 15 नगरसेवकांनी आपल्या-आपल्या प्रभागातील मनपाच्या आरोग्य केंद्रांवर लक्ष केंद्रित केले आहे. आता एक स्वीकृत नगरसेवक आमच्यात सहभागी झाल्याने आम्ही 16 जण मिळून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न करू. ज्या आरोग्य केंद्रांवर डॉक्टर नाहीत किंवा आवश्यक सोयी-सुविधा नाहीत, त्याकडे विशेष लक्ष दिले जाईल. महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला असून त्या अधिक सक्षमपणे कशा चालवता येतील, यावरही आम्ही विचार करत आहोत, असे त्यांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीबाबत बोलताना सचिन भेंडे म्हणाले, आमदार रवी राणा यांनी आम्हाला जनतेशी नम्रतेने वागण्याचा सल्ला दिला आहे. साईनगर प्रभागातील निवडणूक ही नम्रतेविरुद्ध होती, असे म्हणत ते थांबले आणि पुढचे तुम्ही समजून घ्या, असे म्हणत त्यांच्या चेहर्‍यावर हलकी हास्यरेषा उमटली. तुमच्या प्रभागात खुद्द राज्याचे मुख्यमंत्री प्रचारासाठी आले होते. त्याचे दडपण आले नाही का? या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले की, आमचे नेते रवी राणा यांच्यावर आमचा प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे दडपण येण्याचा प्रश्नच नव्हता. आमदार रवी राणा, सौ. नवनीत राणा आणि सुनील राणा यांनी प्रभागात प्रचार केला आणि लोकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. त्यातूनच माझा विजय झाला, असे त्यांनी नम्रपणे सांगितले.
सध्या अमरावतीकरांना कचरा समस्येचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी 26 फेब्रुवारी रोजी महानगरपालिकेची विशेष आमसभा बोलावण्यात आली आहे. मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी कचरा समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून नव्या ठेकेदारी पद्धतीद्वारे ही समस्या लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास उपमहापौरांनी व्यक्त केला. शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून यासंदर्भात शहर पोलीस आयुक्तांशी चर्चा करून लवकरच तोडगा काढला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
वादग्रस्त ठरलेल्या रेल्वे पुलाबाबत उपमहापौर सचिन भेंडे म्हणाले की, संपूर्ण पूल तोडून नव्याने बांधणे शक्य नाही. त्याऐवजी रेल्वेच्या हद्दीतील भाग नव्याने बांधून उर्वरित पूल कायम ठेवण्याचा विचार आहे. त्यामुळे काम लवकर पूर्ण होईल आणि नागरिकांचा त्रासही कमी होईल. यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या विधानानंतर रेल्वे पूल पूर्णपणे नव्याने बांधण्याच्या योजनेवर पडदा पडल्याचे स्पष्ट झाले आहे.राजकीय विश्लेषक माधव पांडे यांनी घेतलेली ही मुलाखत ‘मंडल न्यूज’ या यूट्यूब चॅनलवरही प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button