आ.साजिद खान पठाण यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा द्या

आ.साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

पोलीस महानिरीक्षक यांना मागणी

अमरावती/23 फेब्रुवारी : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार साजिद खान पठाण यांना 17 फेब्रुवारी 2026 रोजी बिश्नोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी आल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कॅलिफोर्निया येथून शुभम लोणकर याने फोन करून दोन दिवसांच्या आत 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली असून, पैसे न दिल्यास भीषण परिणाम सोसावे लागतील असा इशारा दिला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे अमरावती विभागात संतापाची लाट असून, अल्पसंख्याक आणि दलित समाजाचा बुलंद आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आमदारांना तातडीने ’वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा आणि ताफा पुरवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या गंभीर घटनेनंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस सागर कलानेंच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ गृहमंत्री, विशेष पोलीस महानिरीक्षक आणि विभागीय आयुक्तांना भेटले. आमदारांचे स्वीय सहाय्यक सय्यद अहमद यांनीही या तक्रारीत सहभाग नोंदवला. सागर कलाने यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, साजिद खान पठाण हे सतत सर्वसामान्य, अपंग आणि गोरगरीब जनतेच्या हक्कासाठी लढणारे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या सुरक्षिततेबाबत जर प्रशासनाने दिरंगाई केली आणि त्यांच्या केसालाही धक्का लागला, तर मुख्यमंत्री महोदयांना अमरावतीत पाय ठेवू देणार नाही. युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, ज्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल. लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीला अशा धमक्या मिळणे हा थेट वैचारिक मूल्यांवर हल्ला असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी आसिफ तवाकल, नझीर खान, फिरोज शाह, समीर जवंजाळ, गुड्डू हमीद, वैभव देशमुख, आशिष यादव यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button