पिकअप दरीत कोसळली, 4 ठार 12 जखमी
ब्लॅक संडे ! रात्रीच्या काळोखात मेळघाटच्या जंगलात मृत्यूचे तांडव !!

* अंधारात बचाव कार्य सुरु, शिवझिरी घाटातील घटना
* जखमींवर इर्विन, जिल्हा उपरुग्णालय धारणी येथे उपचार
* अपघातग्रस्त गाडीचा ड्रायव्हर फरार, घटनास्थळी पी.आय., तहसीलदाराची धाव
धारणी / 22 फेब्रुवारी : मेळघाटातील दुर्गम डोंगरदर्यांमध्ये रविवारी सायंकाळी काळाने असा काही क्रूर अट्टाहास मांडला की, अवघा अमरावती जिल्हा सुन्न झाला. नियतीचा फेरा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे धारणी तालुक्यातील शिवझिरी घाटात मजुरांनी भरलेली पिकअप 70 फूट खोल दरीत कोसळली. या काळजाचा थरकाप उडवणार्या भीषण अपघातात कंजोली गावातील चार नागरिकांचा जागीच मृत्यू झाला, तर 5 जण मृत्यूच्या दारात असल्याने त्यांना तातडीने अमरावतीला हलवण्यात आले आहे. घाटातील जीवघेण्या खड्ड्यांमुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि क्षणात हसत्या-खेळत्या कुटुंबांची राखरांगोळी झाली. हा निव्वळ अपघात नसून, खराब रस्त्यांकडे दुर्लक्ष करणार्या प्रशासनाने केलेला ’नरसंहार’ असल्याची जळजळीत भावना आता संपूर्ण मेळघाटात पेटून उठली आहे.
धारणी तालुक्यातील कंजोली आणि परिसरातील 15 ते 20 मजूर व गरीब नागरिक दर रविवारप्रमाणे शेजारील मध्य प्रदेशातील देडतलाई येथील आठवडी बाजारासाठी गेले होते. दिवसभर कष्ट करून आणि संसारासाठी लागणारे किराणा सामान घेऊन सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास हे सर्वजण पिकअप वाहनाने आनंदाने घराकडे परतत होते. मात्र, शिवझिरी ते राणीगाव दरम्यानच्या घाटात ’घोडादेव बाबा’ मंदिराजवळ असलेल्या धामणनाल्यापाशी मृत्यूने मजुरांचा रस्ता रोखला. या घाटातील रस्ता अनेक वर्षांपासून पूर्णपणे उखडला असून तेथे केवळ मृत्यूचे सापळे म्हणजेच मोठे खड्डे शिल्लक आहेत. घाटातील तीव्र चढण-चढत असताना अचानक समोर आलेल्या एका अवाढव्य खड्ड्यामुळे पिकअप चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. क्षणार्धात हे वाहन मागे सरकू लागले आणि प्रवाशांच्या हृदयद्रावक किंकाळ्यांनी आसमंत दुमदुमण्यापूर्वीच गाडी थेट 70 फूट खोल दरीत कोसळली. दरीत कोसळताना गाडीने अनेक कोलांटउड्या घेतल्याने आतील प्रवाशांचा अक्षरशः चक्काचूर झाला. या भीषण तांडवात शुकरही बिसराम धांडे (वय 45 वर्षे), सीताराम पटेल सेलूकर (वय 58 वर्षे), बाबुलाल बुढा दहिकर (वय 56 वर्षे) आणि किसन तानू धांडे (वय 58 वर्षे) या चौघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच धारणीचे ठाणेदार अवतारसिंग चव्हाण, तहसीलदार प्रदीप शेवाळे आणि नगरसेवक पंकज मोरे यांनी तातडीने मदत पथकासह घटनास्थळी धाव घेतली. रात्रीचा अंधार आणि दुर्गम भाग असल्याने बचाव कार्यात मोठे अडथळे आले, मात्र स्थानिक तरुणांच्या माणुसकीमुळे जखमींना दरीतून बाहेर काढण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, अपघातानंतर पिकअप चालक रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना वार्यावर सोडून जंगलाचा फायदा घेत फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
या अपघातातील 5 जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे हलवण्यात आले आहे. यामध्ये देवा बिसराम धांडे (वय 15 वर्षे), ग्यारू प्यारसिंग देवडे (वय 30 वर्षे), अर्चना राजेश दारशिंबे (वय 30 वर्षे), रिताबाई मंगल राठोड (वय 45 वर्षे) आणि धुनिबाई बाबुलाल दहिकर (वय 55 वर्षे) यांचा समावेश आहे. तर अंश मिनेश ठाकरे (वय 4 वर्षे), कन्याकुमारी मिनेश ठाकरे (वय 24 वर्षे), शांताबाई श्रीराम जावरकर (वय 40 वर्षे), लक्ष्मी रामदास दारशिंबे (वय 28 वर्षे), कालू रामदास दारशिंबे (वय 4 वर्षे), मिनेश बन्सी ठाकरे (वय 30 वर्षे) आणि बिसराम हिरालाल धांडे (वय 50 वर्षे) यांच्यावर धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पीडित कुटुंबांना न्याय द्यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
खूनी खड्डे आणि प्रशासकीय मस्ती
शिवझिरी घाटातील रस्ता म्हणजे प्रवाशांसाठी ’यमलोक’ची वाट ठरत आहे. घाटात ना सुरक्षा कठडे आहेत ना रस्त्याची डागडूजी. उतारावर असलेले ते अवाढव्य खड्डे आज चार निष्पाप मजुरांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले आहेत. अनेकवेळा तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुस्त अधिकार्यांनी याकडे दुर्लक्ष केले. आता या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अधिकार्यांवर कठोर कारवाई होणार का?
रक्ताच्या थारोळ्यात मदतीसाठी टाहो
अपघात एवढा भीषण होता की दरीतून केवळ किंकाळ्या ऐकू येत होत्या. पिकअप चालक फरार झाला असला तरी परिसरातील आदिवासी बांधवांनी आणि पोलिसांनी जीवाची पर्वा न करता जखमींना बाहेर काढले. जखमी मजुरांचे सामान, खरेदी केलेला किराणा आणि रक्ताचा सडा पडलेले ते दृश्य पाहून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले. मेळघाटातील गरीब जनतेच्या जीवाशी हा खेळ कधी थांबणार, असा सवाल विचारला जात आहे.




