महाराजांनी दाखवलेल्या वाटेवर चालायचे

सुनेत्रा पवार अजितदादांच्या आठवणीने झाल्या भावूक

पुणे /19 फेब्रुवारी – शिवनेरी किल्ल्यावरून भाषण करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, राज्यातील शेतकरी, कष्टकरी जनतेला सुखी-समाधानी ठेव, छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या वाटेवर चालायचे बळ आम्हा सर्वांना दे, असे साकडे मी आई शिवाई देवीच्या चरणी घालते. यापूर्वी अनेकदा शिवछत्रपती महाराज आणि जिजाऊ माँसाहेबांना वंदन करण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर येण्याचे भाग्य मला लाभले होते. पण आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत वेगळा आणि जबाबदारीची जाणीव करुन देणारा आहे. मी नुकतीच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ज्या कठीण प्रसंगात मी शपथ घेतली, त्यावेळी माझ्या डोळ्यांसमोर जिजाऊ माँसाहेब उभ्या होत्या. जिजाऊ माँसाहेबांनी केवळ शिवरायांना जन्म दिला नाही, त्यांना स्वराज्याचा ध्यास दिला, संस्कार दिले आणि संकटाशी दोन हात करण्याची जिद्द दिली. तीच तुमची आमची प्रेरणा आणि आधार आहे. शिवरायांच्या जन्मभूमीवर आज बोलताना माझ्या अंगावर काटा आला आहे. छत्रपती शिवरायांनी मावळ्यांना दिलेली स्वराज्याची शपथ आठवली. आपण सगळेजण शिवरायांचे मावळे आहोत, हीच भावना आज माझ्या मनात आहे. ज्या विचारांवर आदरणीय दादांनी आयुष्यभर वाटचाल केली, तोच शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा मी कधीही सोडणार नाही, हा शब्द मी या पवित्र भूमीवर शिवजयंतीच्या दिवशी मी तुम्हाला देते, असे यावेळी त्यांनी म्हटले.

संबंधित बातम्या

Back to top button