मूर्तिजापूर स्थानकावर मालगाडीला भीषण आग
अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

मूर्तिजापूर / 18 फेब्रुवारी : स्थानिक रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका कोळशाच्या मालगाडीला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बडनेरा येथून अकोल्याच्या दिशेने धावणारी ही मालगाडी स्थानक परिसरात उभी असताना, तिच्या एका वॅगनमधून धुराचे लोट निघू लागल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने, अग्निशमन दलाने वेळेत धाव घेतल्याने मोठी जीवितहानी टळली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. रेल्वेच्या मालवाहतूक मार्गावरील अत्यंत वर्दळीचे केंद्र असलेल्या मूर्तिजापूर स्थानकावर आज भीतीचे वातावरण पसरले होते. बडनेरा बाजूकडून अकोल्याकडे मार्गस्थ होत असलेली कोळशाची मालगाडी (वॅगन क्रमांक 24072510540) तांत्रिक कारणास्तव मूर्तिजापूर स्थानकात उभी करण्यात आली होती. यावेळी अचानक एका वॅगनमधील कोळशाने पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले आणि आकाशात धुराचे लोट पसरले. ही बाब रेल्वे कर्मचार्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने वरिष्ठांना सूचित केले.
घटनेचे गांभीर्य ओळखून मूर्तिजापूर नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ आपल्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना केल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावत युद्धपातळीवर पाण्याचा मारा केला आणि ही आग इतर वॅगन्सपर्यंत पसरण्याआधीच विझवली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की उन्हाच्या तीव्रतेमुळे झालेल्या घर्षणामुळे, याचा अधिकृत खुलासा अद्याप झालेला नाही. रेल्वे सुरक्षा बल आणि तांत्रिक विभागाने या घटनेचा पंचनामा सुरू केला असून, सखोल तपासानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल. या संकटसमयी स्थानिक नागरिकांची आणि प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती, मात्र रेल्वे प्रशासनाने परिस्थिती संयमाने हाताळली.
तपासाचे चक्र फिरले -मालगाडीच्या वॅगन क्रमांक 24072510540 मध्ये लागलेली आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत रेल्वे विभाग आता तांत्रिक तपासणी करत आहे. कोळशाचे घर्षण की विजेचा बिघाड, अशा विविध अंगांनी चौकशी सुरू असून नगरपरिषद अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा रेल्वे अपघात टळल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.




