पोलिस पहार्यातील 5 न्यायाधीशांची घरे फोडली

* न्यायमंडळ व वकिलांमध्ये प्रचंड खळबळ
* लाखोंचा माल लंपास
* मध्यरात्री चोरांची टोळी सक्रीय
* चोरीपूर्वी केली होती ‘रेकी’
अमरावती /15 फेब्रुवारी : अमरावतीच्या गुन्हेगारी जगतात आज एकच खळबळ उडाली! ज्यांच्या एका शब्दाने गुन्हेगारांचे धाबे दणाणतात आणि ज्यांच्या कोर्टात गुन्हेगार थरथर कापतात, त्या न्यायदेवतेच्या रक्षकांच्याच घरात शिरून चोरट्यांनी चक्क कायद्यालाच ’चॅलेंज’ दिले आहे.
अमरावतीच्या अतिसुरक्षित जिल्हा सत्र न्यायालय वसाहतीत शनिवारी मध्यरात्री सराईत चोरट्यांच्या एका टोळीने अक्षरशः तांडव घातले. पाच उच्चपदस्थ न्यायाधीशांच्या निवासस्थानांसह चार न्यायालयीन कर्मचार्यांची घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवजी लंपास केला. चोवीस तास पोलीस बंदोबस्त असलेल्या या वसाहतीत चोरट्यांनी घातलेला हा धुमाकूळ म्हणजे अमरावती पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि गस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार आणि रविवार अशा सलग दोन सुट्ट्यांचा मुहूर्त चोरट्यांनी साधला. न्यायाधीश वसाहतीतील दोन महत्त्वाच्या इमारतींना या टोळीने लक्ष्य केले. ’नल-दमयंती’ या नव्या आलिशान इमारतीमधील तीन न्यायाधीशांची घरे आणि त्या शेजारील ’पैनगंगा’ इमारतीमधील दोन न्यायाधीशांच्या घरांचे कुलूप तोडून चोरटे आत शिरले. केवळ एवढ्यावरच हे चोरटे थांबले नाहीत, तर त्यांनी आपला मोर्चा मागील बाजूला असलेल्या कर्मचारी वसाहतीकडे वळवला. तिथेही तीन सदनिकांमधील चार कर्मचार्यांच्या घरांचे उंबरठे ओलांडून कपाटे रिकामी केली. ज्या घरांना कुलूपे होती, नेमकी तीच घरे या टोळीने शोधून काढली. यावरून चोरट्यांनी या अतिसुरक्षित भागाची आधीच कित्येक दिवस पद्धतशीर ’रेकी’ (पाहणी) केली असावी, असा संशय रहिवाशांनी व्यक्त केला आहे.
पहाटे चारच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आणि संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी धडकला. फॉरेन्सिक विभागाचे अधिकारी, ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाच्या मदतीने तातडीने पुराव्यांची शोधाशोध सुरू झाली. सकाळी 8 वाजेपर्यंत पोलीस आयुक्त स्वतः प्रत्येक घरात जाऊन पाहणी करत होते आणि तपासाचे आदेश देत होते. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, चोरटे इमारतीच्या मागील बाजूला असलेल्या झाडीझुडपांचा फायदा घेऊन संरक्षक भिंतीवरून उड्या मारून पळताना कैद झाले आहेत. चोरटे इतके सराईत होते की, त्यांनी दागिन्यांच्या डब्यातून सोने-चांदी चोरली आणि रिकामी डबी पुन्हा जागेवर व्यवस्थित बंद करून ठेवली, जेणेकरून चोरी झाल्याचे चटकन लक्षात येऊ नये.
या चोरीमध्ये न्यायालयीन कर्मचारी आशिष गेडाम यांना मोठा फटका बसला. गेडाम हे अकोला येथे एका नातेवाईकाच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. त्यांचे घर फुटल्याची माहिती मिळताच ते हातातले काम सोडून सकाळी सातच्या रेल्वेने तातडीने अमरावतीत परतले. घरी पोहोचल्यावर त्यांना धक्काच बसला; त्यांच्या बेडरूममधील कपाट फोडलेले होते आणि तिजोरीतील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख 3 ते 4 हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले होते. गेडाम यांनी सांगितले की, चोरट्यांनी अत्यंत चतुराईने दागिने काढून डबे पुन्हा बंद करून ठेवले होते.
ज्या परिसरात पोलिसांची चोवीस तास गस्त असते आणि प्रवेशद्वारावर कडक पहारा असतो, तिथेच असा धाडसी डल्ला पडल्याने आता अमरावतीकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले असून विविध पथके चोरट्यांच्या मागावर रवाना केली आहेत. आता या सराईत टोळीला जेरबंद करून न्यायदेवतेच्या सन्मानाची परतफेड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.चोरट्यांनी घरफोडी करताना अत्यंत चाणाक्षपणा दाखवला. अनेक दिवसांपासून बंद असलेल्या घरांच्या कुलपांवर साचलेली धूळ पाहून या घरात कोणीही राहत नसावे, असा अचूक अंदाज या टोळीने बांधला. शनिवारी आणि रविवारी वसाहतीतून कोण-कोण बाहेरगावी गेले आहे, याची खडान् खडा माहिती या टोळीकडे असावी असा दाट संशय आहे. धुळीने माखलेली ती कुलपेच चोरट्यांसाठी चोरीचे ’आमंत्रण’ ठरली आणि त्यांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून हा धाडसी गुन्हा केला.




