भारताला आर्थिक महाशक्ती बनवण्याची जबाबदारी युवांवर
जी एच रायसोनी विद्यापीठ, अमरावतीचा दीक्षांत समारंभ

अमरावती /12 फेब्रुवारी : भारत स्वावलंबी आणि विकसित राष्ट्र बनण्याचे स्वप्न लवकरच साकार होऊ शकते. देश विश्वातील आर्थिक महाशक्ती बनू शकतो आणि जगाचे नेतृत्वही करू शकतो. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा देशातील युवा वर्ग यासाठी ठोस प्रयत्न करेल.
शुक्रवारी जी. एच. रायसोनी अमरावती विद्यापीठाच्या 6व्या दीक्षांत समारोहात वक्त्यांनी ही एकमताने राय व्यक्त केली. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती येथे हा समारोह पार पडला. रायसोनी एज्युकेशनचे कार्यकारी संचालक श्री. श्रेयश रायसोनी यांनी समारोहाचे अध्यक्षस्थान भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री, लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य उपस्थित होते. तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, कुलसचिव डॉ. स्नेहिल जैस्वाल आणि परीक्षा नियंत्रक डॉ.विनायक डकरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. डॉ. मेत्री यांनी भाषणात सांगितले की, भारताला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्यासाठी केंद्र सरकारने 2047 पर्यंतचे उद्दिष्ट ठेवले आहे. युवा वर्ग ज्या प्रकारे देशाच्या विकासात योगदान देत आहे, त्यामुळे हे स्वप्न लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे. युवांच्या सामर्थ्यामुळे भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. 2047 पर्यंत भारत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनू शकतो आणि जगाचे नेतृत्वही करू शकतो. युवांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया यांसह अनेक योजना राबवल्या आहेत. यामुळे जगात भारताची स्थिती मजबूत झाली असून संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे. डॉ. अतुल वैद्य यांनी युवांना कौशल्य विकासावर अधिक भर देण्याचे आवाहन केले. देशाच्या विकासात योगदान देणार्या महापुरुषांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, त्यांच्या समर्पणामुळे भारताचा मान जगात वाढला आहे. समारोहाचे अध्यक्ष श्रेयश रायसोनी यांनी सर्व पदवीधर विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी विद्यापीठाच्या प्रगतीची माहिती दिली आणि भविष्यातील योजनांची माहिती दिली.




