पेंशन समाधान उपक्रम, पेंशन अदालत उत्साहात
पेंशन समाधान उपक्रम, पेंशन अदालत उत्साहात

अमरावती/10 फेब्रुवारी : जिल्हा कोषागार कार्यालयातर्फे कोषागार कार्यालयातील जिजाऊ सभागृहात आहरण व संवितरण अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी पेंशन समाधान उपक्रम आणि पेंशन अदालत उत्साहात पाडली.
कोषागार अधिकारी अमोल इखे अध्यक्षस्थानी होते. महालेखापाल नागपूर यांचे कार्यालयातील वरीष्ठ लेखाधिकारी मैथीली जगनाथन, सहाययक लेखाधिकारी अनुपमा भटटाचार्य, लेखापाल सचिनकुमार, वरीषठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार उपस्थित होते. महालेखापाल कार्यालयातील अधिकारी यांनी अचूक निवृत्ती वेतन प्रस्ताव कसे तयार करावेत, ज्यामुळे निवृत्ती वेतन व कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांना वेळेवर लाभ प्रदान करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी निवृत्तीवेतनविषयक प्रश्नांची तात्काळ सोडवणूक करुन देण्यात आली. तसेच शंकाचे समाधान करण्यात आले. उपस्थितांनी माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निवृत्तीवेतन प्रदाने तात्काळ करण्यासाठी महालेखाकार कार्यालय, कोषागार कार्यालय आणि संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी एकत्रितपणे कार्य करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. कनिष्ठ लेखापाल साजीया शमसू मोहम्मद यांनी प्रास्ताविक केले, त्यांनी निवृत्तीवेतन विहीत कालावधीत प्रदान करणेसाठी कोषागार कार्यालयाची भूमिका विषद केली. तसेच पेंशन समाधान उपक्रम आणि पेंशनअदालतीचे आयोजन करण्याचे उद्दीष्ट सांगितले. कनिष्ठ लेखापाल श्रुतिका तडस यांनी सूत्रसंचालन केली. निवृत्तीवेतन धारकांकरीता पेंशन अदालत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डी. आर. देशमुख, जगदीश सायसिकमल, विरेंद्र दिक्षीत आदी उपस्थित होते. वरीष्ठ लेखापाल राम जाधव यांनी प्रस्ताविक केले. यावेळी निवृत्तीवेतनधारक, तसेच कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांसाठी राबविण्यात येणार्या उपक्रमांची माहिती दिली. निवृत्तीवेतन धारकास घरपोच सेवा देण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. जगदीश सायसिकमल यांनी सेवानिवृत्त संघटनेच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचार्यांचे लाभ त्यांना विहीत कालावधीत मिळण्यासाठी कोषागार कार्यालय आणि महालेखाकार कार्यालय करीत असलेल्या उपक्रमांची प्रशंसा केली. विरेंद्र दिक्षीत यांनी मांडलेल्या तक्रारीची महालेखाकार कार्यालयाच्या चमूने तात्काळ सोडवणूक केली.




