आ.संजय खोडके चार पावलं पुढे जाऊन योग्य ठिकाणी थांबले!

अमरावती / 5 फेब्रुवारी – महापालिकेचे राजकारण म्हणजे केवळ सत्तासंघर्ष नव्हे, तर अनेक नेत्यांच्या राजकीय अस्तित्वाचीच कसोटी असते. अमरावती महापालिकेत अमरावती आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघांचे राजकारण कायमच शिजत असते. कारण महापालिकेतील नगरसेवक हे उद्याच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी मुख्य संपर्कसूत्र ठरतात. त्यामुळे ज्या पक्षाकडे व ज्या नेत्याकडे अधिकाधिक नगरसेवक असतात, त्याची विधानसभा निवडणूक अधिक भक्कम होते. नगरसेवकपद हे केवळ प्रभागापुरते मर्यादित नसून, राजकीय पक्षांसाठी निवडणूक यंत्रणेचा कणा म्हणून नगरसेवकांकडे पाहिले जाते. याच पार्श्वभूमीवर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवा स्वाभिमान पक्षाने एकमेकांविरोधात महापालिका निवडणूक लढवली. युती होणार म्हणून एकमेकांना झुलवत बसलेले पक्ष प्रत्यक्ष रणांगणात मात्र समोरासमोर ठाकले. नीती, व्यूहरचना आणि पाडापाडीमुळे ही निवडणूक विशेष गाजली. निकाल लागल्यानंतर भाजपला अनपेक्षित धक्का बसला. सत्ताधारी भाजपला 25 जागांवर समाधान मानावे लागले. त्याखालोखाल युवा स्वाभिमानला 15 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 11 जागा मिळाल्या. राज्य सरकारमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र असले, तरी राज्याच्या राजकारणात अनेक ठिकाणी भाजपविरोधात राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळतो. नगरपरिषद, महानगरपालिका आणि काही जिल्हा परिषदांमध्ये भाजपने थेट राष्ट्रवादीविरोधात संघर्ष केला आहे. अमरावतीतही भाजपची थेट लढत काँग्रेस-राष्ट्रवादीशी होती. सुरुवातीला युवा स्वाभिमानची भूमिका भाजपपूरक असल्याचे भासले. मात्र नंतर अनेक प्रभागांमध्ये युवा स्वाभिमानने भाजपच्या तोंडचे पाणी पळवले. हा सगळा इतिहास पुढील राजकारणात वारंवार समोर येणार आहे. त्यामुळे ‘दिलजमाई’, ‘मैत्री’, ‘जुळवून घेणे’ हे शब्द महापालिकेच्या राजकारणात फारसे अर्थपूर्ण ठरत नाहीत. प्रशासन आणि सत्ताकेंद्रावर नेमका कोणाचा दबदबा राहणार, यासाठीची लढाई आता सुरू झाली आहे. भाजपने काही दिवसांपूर्वी दोन जुळ्या महापौरांच्या नावांची घोषणा केली. त्याचवेळी उपमहापौर पदासाठी युवा स्वाभिमानने आपल्या उमेदवारांची घोषणा केली. या घोषणा करताना राष्ट्रवादीचा पाठिंबा गृहीत धरला गेला, असे नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. संजय खोडके आणि युवा स्वाभिमानचे नेते आ. रवी राणा यांचे सख्य राज्यभर प्रसिद्ध आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर आ. खोडके यांनी निवडणुकीपूर्वी स्पष्ट भूमिका मांडली होती की, निकाल काहीही लागला तरी स्वाभिमानला पाठिंबा देणार नाहीत आणि राणांशी हातमिळवणी करणार नाहीत. अशा घोषणा निवडणुकीत मतध्रुवीकरणासाठी उपयुक्त ठरतात. बडनेरा विधानसभा मतदारसंघात आ. सौ. सुलभाताई खोडके प्रतिनिधित्व करत होत्या. त्यांचा पराभव करून रवी राणांनी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले. त्यानंतरच्या अनेक निवडणुकांत व व्यासपीठांवरून रवी राणांनी खोडके कुटुंबीयांवर टीकास्त्र सोडले. राजकारणात विरोधकांच्या टीकेला सहन करण्याचा सल्ला स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नेहमी देत असत. आ. खोडके यांनीही राणांना फारसे प्रत्युत्तर न देता सहनशीलतेची भूमिका घेतली. मात्र हा संघर्ष केवळ पक्षीय नसून, वैयक्तिक पातळीवरही गेला. त्यामुळेच स्वाभिमानला पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे अत्यंत दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या प्रत्येक राजकीय निर्णयात, पक्षबांधणीत आणि संघटनात्मक धोरणात आ. संजय खोडके यांची महत्त्वाची भूमिका राहिली होती. दादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली, तरी अर्थमंत्रीपद आणि पक्षाध्यक्षपदाबाबत अजूनही चर्चा सुरू आहे. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, तर दुसरीकडे काही नेते विलगीकरणासाठी दबाव टाकत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती महापालिकेत राष्ट्रवादीने फार ताणून धरण्याची परिस्थिती नव्हती. स्वाभिमानला सहजासहजी पाठिंबा देणे ही आ. खोडके यांची राजकीय चूक ठरली असती, याची त्यांना पूर्ण जाणीव होती. म्हणूनच गेल्या चार दिवसांत एक नियोजित चर्चा पसरवण्यात आली की, महापौरपदासाठी राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देईल, मात्र उपमहापौरपदासाठी नाही. ही वार्ता लोकांपर्यंत व्यवस्थित गेली आणि तिचा अपेक्षित परिणामही झाला. भाजपमधील एक गट स्वाभिमानवर दबाव टाकण्यासाठी सक्रिय झाला. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी गैरहजर राहिल्यास काँग्रेस वा इतर पक्षांना फायदा होऊ शकतो, अशा चर्चांनाही उधाण आले. भाजप हा सावध पक्ष असून, 25 जागा मिळाल्यामुळे कोणतीही जोखीम घ्यायला तो तयार नव्हता. आ. संजय खोडके यांनी अत्यंत नियोजनपूर्वक स्वाभिमानवर अप्रत्यक्ष दबाव निर्माण केला. परिणामी भाजपने राष्ट्रवादीची भूमिका स्वाभिमानसमोर उघड केली. तिन्ही पक्ष आपापल्या सोयीने एकमेकांवर दबाव टाकत पुढे सरकत आहेत. आज पालकमंत्री व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आ. संजय खोडके आणि आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्याशी चर्चा केली. चर्चा राजकीय असली, तरी पालकमंत्र्यांनी अशा कोणत्याही चर्चेचा इन्कार केला आहे, जो अपेक्षितच आहे. कठीण परिस्थितीतही राजकारणात दबाव कसा निर्माण करायचा आणि तो दिसू न देता कसा वापरायचा, याची चांगली खेळी सध्या तरी आ. संजय खोडके यांनी खेळली आहे. किती पावले पुढे जायचे आणि कुठे थांबायचे, याची त्यांनी आधीच खुणगाठ बांधलेली दिसते. सध्याच्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादीला ‘देवाभाऊं’ची गरज आहे. अशा वेळी आ. खोडके ‘युतीधर्म’ पाळणारच त्यामूळे इतर प्रश्न सध्या नाहीत.




