शेतकर्यांचे कैवारी महात्मा फुले निबंध लेखन स्पर्धा

अमरावती /4 फेब्रुवारी : महात्मा फुले यांच्या विचारांत समग्र क्रांतीची बीजे दडलेली असल्याने त्यांना आधुनिक प्रबोधन पर्वाचे प्रणेते मानले जाते. शेतकर्यांच्या जीवनाचा विकास हा शेती सुधारल्याशिवाय होऊ शकत नाही, म्हणून त्यांनी विविध योजना सुचविल्यात. बळीराजा हा जगला पाहिजे. त्याचे शोषण थांबले पाहिजे म्हणून म. फुलेंनी शेतकरी विकासाचे सूत्रच मांडले. त्यांच्या विचाराची अंमलबजावणी करण्याची खर्या अर्थाने आज गरज आहे. म्हणूनच वर्हाड विकास प्रकाशन संस्था व म. फुले चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शेतकर्यांचे कैवारी महात्मा फुले ह्या विषयावर राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विदर्भासह पुणे, मुंबई, उल्हास नगर, छ. संभाजीनगर येथील अभ्यासकांनी निबंध लेखनातून फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. निबंध लेखन स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतिय क्रमांकाच्या निबंध लेखकांना स्व. बाबुरावजी भोजने स्मृती प्रित्यर्थ रोख रक्कम देवून दि.7 फेब्रुवारी रोजी श्री. क्षेत्र अडूळा बाजार येथील महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनात खासदार श्री. बळवंतराव वानखडे, साम्यवादी विचारवंत भाई तुकाराम भस्मे, आमदार श्री. गजानन लवटे तसेच फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील अभ्यासक व ज्येष्ठ साहित्यिक डॅा. प्रवीण बनसोड (नेर), डॅा. प्रकाश मानेकर, डॅा. प्रशांत विघेसह इतरही मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानीत करण्यात येईल. निबंधलेखन स्पर्धाचे आयोजक प्रा.श्रीकृष्ण बनसोड व प्राचार्य प्रदीप लांडे यांनी स्व. बाबुरावजी भोजने स्मृती प्रित्यर्थ बक्षिससाठी रोख रक्कम जाहिर केल्याबद्दल श्री.श्रीकृष्ण बोबडे, डॅा. जयश्री बोबडे, मनोज भोजने, मुकेश भोजने आदिंना धन्यवाद दिले. तसेच निबंध लेखकांचे अभिनंदन केले.




