ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा गोविंदपूरच्यावतीने अधिकारांचा गैरवापर

शासकीय गायराण जमीन खाजगी कंपनीला देण्याचा डाव

* बिरसा ब्रिगेडचे मनिष धुर्वे यांचा ग्रामपंचायत प्रशासनावर आरोप

अमरावती /3 फेब्रुवारी : ब्राह्मणवाडा गोविंदपुर येथील ग्रामपंचायत प्रशासनाने आपल्या अधिकारांचा गैरवापर करीत शासकीय गायराण जमीन खाजगी कंपनीच्या घशात घालून ग्रामस्थांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप बिरसा ब्रिगेडचे कार्यकर्ते मनिष धुर्वे यांनी केला आहे. ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा गोविंदपुर सध्या भ्रष्टाचाराचा अड्डा बनले असून याप्रकरणी प्रशासनाकडून जाणीवपूर्वक नियमांना डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
ग्रामपंचायतीच्या दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या मासिक सभेत घेतलेल्या अनधिकृत ठरावाद्वारे मौजे ब्राह्मणवाडा गोविंदपुर येथील गट क्रमांक 247 मधील शासकीय गायराण जमीन, जी गावातील तरुणांसाठी नियोजित क्रीडा मैदानासाठी आरक्षित होती, ती सीएमईएस ज्युपिटर प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीला टॉवर उभारण्यासाठी देण्यात आल्याचे उघड झाले आहे. हा ठराव महसूल अधिनियम 1966 च्या कलम 12 तसेच 7 सप्टेंबर 2010 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करून मंजूर करण्यात आल्याचा आरोप आहे. या ठरावाच्या आधारे संबंधित कंपनीने पुढील कामकाज सुरू केले असल्याचेही सांगण्यात आले. तसेच 29 डिसेंबर 2025 रोजी ग्रामसभेत कोणतीही चर्चा न करता, मौजे दस्तापूर व ब्राह्मणवाडा गोविंदपुर येथील खाजगी क्षेत्रात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सीएमएस ज्युपिटर प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई यांना बेकायदेशीररित्या ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी संबंधित विभागांची पूर्वपरवानगी न घेता, जमीन भाडेतत्त्वावर देण्यापूर्वी आवश्यक असलेले भाडे, कालावधी, अटी व शर्ती, जमिनीचा तपशील आदी बाबी ठरावात नमूद करण्यात आल्या नाहीत. तसेच कंपनीकडून लीज करार व संबंधित कागदपत्रे ग्रामपंचायत कार्यालयात जमा न करताच कारवाई करण्यात आली असल्याचे मनिष धुर्वे यांनी सांगितले. मॉडेल लँड लीजिंग कायद्यानुसार शासनाच्या सुधारित धोरणानुसार प्रति एकरी 50 हजार रुपये प्रतिवर्ष मोबदला अपेक्षित असताना, प्रत्यक्षात शेतकर्‍यांना केवळ 28 ते 30 हजार रुपये प्रति एकर इतकाच मोबदला देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button