मनपात सत्तेचा सव्वा-सव्वा वर्षाचा फॉर्म्युला

महापौरपदी श्रीचंद तेजवानी तर उपमहापौरपदी सचिन भेंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब

* जातीय आणि भाषेचे समीकरण साधत महायुतीचा सत्तेत नवा पायंडा

अमरावती /2 फेब्रुवारी – शहर महानगरपालिकेच्या आगामी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत स्पष्ट बहुमताचा आकडा गाठण्यासाठी चार पक्षांच्या महायुतीने सत्तेचा एक आगळावेगळा आणि ऐतिहासिक ’सव्वा’ वर्षांचा फॉर्म्युला अमलात आणला आहे.
आगामी 6 फेब्रुवारीला होणार्‍या निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या दिवशीच हे राजकीय चित्र स्पष्ट झाले असून, अडीच वर्षांच्या कार्यकाळात प्रत्येकी दोन नेत्यांना संधी देऊन सर्वसमावेशक राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या नव्या समीकरणानुसार, भारतीय जनता पक्षाचे श्रीचंद तेजवानी आणि आशिष अतकरे हे अनुक्रमे सव्वा-सव्वा वर्षांसाठी महापौरपद भूषवणार आहेत, तर युवा स्वाभिमान पक्षाचे सचिन भेंडे आणि अजय जयस्वाल हे सव्वा-सव्वा वर्षांसाठी उपमहापौर म्हणून पदभार सांभाळतील. सिंधी समाजाला पहिल्यांदाच महापौरपदाचा मान देऊन भाजपने आपली मतपेढी भक्कम करण्याचा यशस्वी डाव खेळला असून, सोबतच मराठी आणि हिंदी भाषिक संतुलनावर भर देऊन सर्व समाजघटकांना सत्तेत प्रतिनिधित्व दिले आहे. महानगरपालिकेत घटलेले संख्याबळ आणि सत्ता राखण्याचे आव्हान पाहता, भाजपसमोर पक्षांतर्गत नाराजी आणि बंडाळी रोखण्याचे मोठे संकट होते. अनेक ज्येष्ठ आणि इच्छुक नगरसेवकांना एकाच वेळी संधी देणे शक्य नसल्याने भाजपने हा ’मधला मार्ग’ शोधून काढला आहे. या प्रयोगातून केवळ एका नेत्याला नव्हे, तर विविध जाती-धर्माच्या प्रतिनिधींना सत्तेत वाटा देऊन आगामी विधानसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. जवाहर स्टेडियम प्रभाग क्रमांक 7 मधून सलग दुसर्‍यांदा निवडून आलेले नगरसेवक श्रीचंद तेजवानी यांची महापौरपदी वर्णी लागल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. विशेष म्हणजे, भाजपचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्याच प्रभागातील हे नगरसेवक असून, त्यांना मानाचे पद मिळवून देण्यात डॉ. धांडे यांनी अत्यंत निर्णायक भूमिका बजावली आहे. याच प्रभागातून सोनाली सचिन नाईक यांनीही भाजपच्या तिकिटावर मोठा विजय मिळवला होता. श्रीचंद तेजवानी हे व्यवसायाने व्यापारी असून ’बढते कदम’ या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून ते शहरात सक्रिय आहेत. सिंधी समाजाच्या विविध संघटनांनी तेजवानी यांच्या नावासाठी केलेल्या आग्रही मागणीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि डॉ. नितीन धांडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.दुसरीकडे, उपमहापौर पदासाठी युवा स्वाभिमान पक्षाने आपल्या वाट्यातील सत्तेचे समसमान विभाजन केले आहे. यामध्ये सचिन भेंडे आणि अजय जयस्वाल यांना प्रत्येकी सव्वा-सव्वा वर्षे संधी मिळणार असल्याने मराठी आणि हिंदी भाषिकांमध्ये योग्य समन्वय साधला गेला आहे. सद्यस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे कोणताही विजयोत्सव साजरा केला जात नसला, तरी प्रभाग क्रमांक 7 आणि शहराच्या राजकीय वर्तुळात या निवडीचे स्वागत होत आहे. अंतर्गत बंडाळी मोडीत काढण्यासाठी आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्यासाठी आखलेला हा ’सव्वा’ सत्तेचा प्रयोग सध्या संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणात अभ्यासू चर्चेचा विषय ठरला आहे.
शहराध्यक्ष धांडे यांचा शब्द अन् तेजवानींचे भाग्य-भाजप शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी आपल्या प्रभागात पक्षाचे वर्चस्व निर्माण करून दोन जागांवर विजय मिळवून दिला होता. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीदरम्यान सिंधी समाजाने केलेल्या मागणीला डॉ. धांडे यांनी दिलेला खंबीर शब्द तेजवानी यांच्यासाठी महापौरपदाची गुरुकिल्ली ठरला. डॉ. धांडे यांच्या कुशल नियोजनामुळेच प्रभाग क्रमांक 7 ला शहराचे प्रथम नागरिकत्व मिळवण्याचा ऐतिहासिक बहुमान मिळाला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button