6 फेब्रुवारीला महापौर पदाचा फैसला
विभागीय आयुक्तांनी काढले सुधारित आदेश

अमरावती /27 जानेवारी : महानगर पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीचा बिगुल वाजला असून, प्रशासनाने आता 30 जानेवारीऐवजी शुक्रवार 6 फेब्रुवारी ही नवीन तारीख निश्चित केली आहे. विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी याबाबतचे सुधारित आदेश जारी केले असून, जिल्हाधिकारी आशिष येरेकर या निवडणूक प्रक्रियेचे पिठासीन अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळतील. या घोषणेमुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, सत्तेची समीकरणे जुळवण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. 6 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता मनपा सभागृहात होणार्या या विशेष सभेत शहराचा नवा कारभारी कोण, याचा निकाल लागेल. या निवडणुकीसाठी 2 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करता येतील.
महानगरपालिकेच्या 87 सदस्यांच्या सभागृहात सत्तेचे गणित जुळवण्यासाठी भाजप, युवा स्वाभिमान पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची महायुती एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. भाजपचे 25, युवा स्वाभिमानचे 15, राष्ट्रवादीचे 11 आणि शिवसेनेचे 3 अशा बलाबलानुसार महायुतीचा दावा भक्कम मानला जात आहे. काँग्रेसचे 15 आणि एमआयएमच्या 12 सदस्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरेल. आतापर्यंत महापौर पदासाठी 1 आणि उपमहापौर पदासाठी 7 अर्जांची उचल झाली असून, सर्वच पक्षांनी आपापले गटनेते निवडले आहेत. मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी विनंती केल्यानंतर ही तारीख निश्चित करण्यात आली असून, आता संपूर्ण शहराचे लक्ष 6 फेब्रुवारीच्या रणधुमाळीकडे लागले आहे.
मनपात आता कमळच फुलणार
अमरावती मनपावर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आमदार रवी राणा यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या महत्त्वपूर्ण बैठकीला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि निवडणूक निरीक्षक संजय कुटे उपस्थित होते. सत्तेचा पेच सोडवण्यासाठी आणि समन्वयाने उमेदवार ठरवण्यासाठी या भेटीत खलबते झाली असून, लवकरच अंतिम नावांवर शिक्कामोर्तब होणार आहे.




