ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंचाला कोंडले
ग्रामस्थांनी कार्यालयातच ठोकले कुलूप

* सातणूरमध्ये कोरमचे कारण देत सभा तहकूब
* प्रशासकीय अनास्थामुळे ग्रामस्थ संतप्त
वरूड /27 जानेवारी : तालुक्यातील सातणूर गट ग्रामपंचायतीमध्ये प्रजासत्ताक दिनी लोकशाहीचा एक अजब आणि तितकाच तीव्र संघर्ष पाहायला मिळाला. सकाळी 11 वाजता आयोजित केलेली ग्रामसभा केवळ गणसंख्येचे (कोरम) कारण पुढे करून अचानक तहकूब केल्याने ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक झाला. संतप्त नागरिकांनी थेट सरपंच शिल्पा बर्डे, उपसरपंच सीमा गजभिये आणि ग्रामसेवक विनोद घोगरे यांना ग्रामपंचायत कार्यालयात डांबून बाहेरून कुलूप ठोकले. या अनपेक्षित प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ नियोजनाचे धिंडवडे निघाले. सातणूरसह रवाळा, जामतळ आणि पुसली या गावांतील नागरिकांना दवंडी देऊन सभेसाठी बोलावण्यात आले होते. नियमानुसार ग्रामसेवकाने पोलीस पाटील, विस्तार अधिकारी, तलाठी आणि आरोग्य सेवक यांनाही नोटिसा बजावल्या होत्या, मात्र या जबाबदार सरकारी कर्मचार्यांनी सभेला दांडी मारल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे, ग्रामस्थ वेळेवर उपस्थित असतानाही केवळ आकड्यांचा खेळ करून सभा टाळण्याचा प्रयत्न पदाधिकार्यांनी केल्याने नागरिक खवळले. आम्ही कामधंदे सोडून येतो आणि तुम्ही सभा उडवून लावता? असा सवाल करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. अखेर कार्यालयात कोंडलेल्या अवस्थेतूनच सरपंच आणि ग्रामसेवकांनी ग्रामस्थांशी संवाद साधला आणि सभा घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच कुलूप उघडण्यात आले. यानंतर पार पडलेल्या सभेत विविध प्रलंबित विषयांवर गावकर्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
प्रशासकीय यंत्रणेचा गलथान कारभार-ग्रामसभेला केवळ गावकरीच नाही तर विविध विभागांचे सरकारी कर्मचारी उपस्थित राहणे बंधनकारक असते. सातणूरच्या घटनेत तलाठी, विस्तार अधिकारी आणि आरोग्य सेवकांनी गैरहजर राहून कर्तव्यात कसूर केल्याचे समोर आले आहे. ग्रामस्थ वेळेवर येऊनही सरकारी यंत्रणेच्या दांडीमुळे आणि लोकप्रतिनिधींच्या धरसोड वृत्तीमुळे ही संघर्षाची स्थिती निर्माण झाली, जी गावाच्या विकासासाठी घातक ठरत असल्याची चर्चा आता रंगली आहे




