अचलपुरात एमआयएम-भाजपची छुपी युती
मुस्लिम समाजाच्या हक्कावर गदा

* काँग्रेसने उघड केला दगाफटका
परतवाडा /23 जानेवारी : अचलपूर पालिकेच्या राजकारणात विकासाच्या नावाखाली एक नवीनच अघोरी समीकरण उदयाला आले असून, एमआयएमने भाजपसोबत हातमिळवणी करून सेक्युलर विचारांना हरताळ फासल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसने केला आहे. अवघ्या सहा दिवसांत राजकीय रंग बदलत एमआयएमने काँग्रेसची साथ सोडून भाजपला जवळ केले, यामुळे मुस्लिम समाजाच्या हातात येणारी सत्तेची चावी निसटली असून हा सर्व प्रकार समाजाशी केलेला विश्वासघात आहे, अशी तोफ डागत काँग्रेसने या ‘अभद्र युती’चा पंचनामा अचलपुरात केला आहे.
परतवाडा-अचलपूरच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. 15 जानेवारीला झालेल्या निवडणुकीत काँग्रेस, एमआयएम, राष्ट्रवादी आणि अपक्ष अशा महाआघाडीने भाजपला धूळ चारली होती. तेव्हा काँग्रेसच्या खुर्शीदबानो अताउल्लाशा 23 मते घेऊन उपाध्यक्ष झाल्या, तर भाजपच्या उमेदवाराला केवळ 19 मतांवर समाधान मानावे लागले. खुद्द पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुले यांनीही तेव्हा भाजप अल्पमतात असल्याचे मान्य केले होते. मात्र, विषय समित्यांच्या निवडीवेळी चित्र पालटले. एमआयएमच्या आठ नगरसेवकांनी अचानक वळण घेतले आणि भाजपच्या गळ्यात गळा घातला.या संदर्भात रामजी पॅलेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते एहतेशाम नबील, असलम वंजारा, जलील पठान आणि अकबर पप्पू यांनी कागदपत्रांसह एमआयएमचा बुरखा फाडला. सत्तेसाठी एमआयएमने भाजपच्या उमेदवारांचे सूचक होण्याचे मान्य केले, तर भाजपने एमआयएमला साथ दिली. आज सभागृहात 21 मुस्लिम नगरसेवक असतानाही एमआयएमच्या या भूमिकेमुळे सर्व विषय समित्या आणि स्थायी समितीवर मुस्लिम समाजाला वर्चस्व मिळवण्याची मोठी संधी होती, ती केवळ सत्तेच्या मोहापायी गमावली गेली. काँग्रेस नेत्यांनी आरोप केला की, एमआयएम फक्त भाषणात मुस्लिम हिताच्या बाता मारते, पण प्रत्यक्षात सत्तेसाठी कोणाचेही पाय धरण्यास तयार असते. अकोल्याच्या अकोटमध्ये जो प्रयोग झाला, त्याचीच पुनरावृत्ती अचलपुरात झाली आहे. काँग्रेसकडे 15 नगरसेवक असूनही केवळ एमआयएमच्या दगाफटक्यामुळे त्यांना सत्तेबाहेर राहावे लागले. काँग्रेस आता आक्रमक विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असून, जनहिताच्या प्रश्नावर या नव्या युतीला धारेवर धरणार आहे. ही युती म्हणजे अचलपूरच्या जनतेशी केलेली प्रतारणा असून, येत्या काळात जनताच याचा हिशोब चुकता करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
सत्तेचा बाजार आणि विश्वासघात -अचलपूर पालिकेत एमआयएमने केवळ सभापती पदासाठी भाजपसोबत केलेली युती ही राजकीय लाचारी आहे. समाजाच्या हितापेक्षा स्वतःचा स्वार्थ मोठा मानणार्या या पक्षाने मुस्लिमांचे प्रतिनिधित्व धोक्यात आणले आहे. काँग्रेसने या व्यवहाराचे सर्व पुरावे जनतेसमोर मांडले असून, हे अपवित्र संधान अचलपूरच्या विकासाला नक्कीच घातक ठरेल.




