डफरीन रुग्णालयातील बेजबाबदारपणामुळे महिलेचा मृत्यू
भूल दिल्यावर महिला गेली कोमात

* दोषी डॉक्टरांवर कारवाईसाठी नातेवाईकांचा रुग्णालयात ठिय्या
अमरावती /23 जानेवारी : स्थानिक डफरीन रुग्णालयात काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. कुटुंब नियोजनाच्या साध्या शस्त्रक्रियेसाठी आलेल्या पल्लवी भूषण गुडदे या 25 वर्षीय तरुण मातेचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप होत आहे. भूलतज्ज्ञांनी सुई टोचल्यानंतर ही महिला शुद्धीवर आलीच नाही आणि अनेक दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आज तिने अखेरचा श्वास घेतला. या प्रकारामुळे पूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट असून आरोग्य प्रशासनाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
अमरावती जिल्ह्याचे मुख्य स्त्री रुग्णालय असलेल्या डफरीनमधील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पल्लवी भूषण गुडदे ही महिला हसत-खेळत आपल्या कुटुंबासह शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झाली होती. मात्र, शस्त्रक्रियेपूर्वी भूलतज्ज्ञांनी तिला भूल देण्याचे सुई टोचली आणि तिथूनच सर्व घात झाला. ती महिला शुद्धीवर येण्याऐवजी थेट कोमात गेली. प्रकृती खालावल्याने तिला तातडीने अतिदक्षता विभागात हलवण्यात आले, मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. गेल्या काही दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणार्या पल्लवीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने गुडदे कुटुंबियांवर आभाळ कोसळले असून पल्लवीचे वडील विनायक संपत मोहणे यांनी रुग्णालय प्रशासनाविरुद्ध रान उठवले आहे. नातेवाईकांचा असा दावा आहे की, पल्लवीची प्रकृती आणि शारीरिक क्षमता यांची योग्य तपासणी न करताच तिला भूल देण्यात आली. हा केवळ अपघात नसून डॉक्टरांचा बेजबाबदारपणा आहे. याप्रकरणी संतप्त नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना लेखी निवेदन देऊन दोषी डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची तीव्रता पाहून प्रशासनाने तातडीने चौकशी समिती नेमली असून अहवाल आल्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र एका निष्पाप मातेचा असा मृत्यू झाल्याने सामान्य नागरिकांमध्ये डॉक्टरांच्या कार्यपद्धतीबद्दल मोठा रोष पाहायला मिळत आहे.
हलगर्जीपणा की अपघात? चौकशीकडे सर्वांचे लक्ष
डफरीन रुग्णालयातील हा प्रकार केवळ एका महिलेचा मृत्यू नसून आरोग्य व्यवस्थेचे अपयश मानले जात आहे. शस्त्रक्रियेपूर्वी आवश्यक असलेल्या सर्व तपासण्या खरोखरच झाल्या होत्या का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या समितीने पारदर्शक तपास करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणे आता काळाची गरज आहे.




