शेअर गुंतवणुकीच्या नावाखाली 52 लाखांची फसवणूक
नागपुरातून आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या आवळल्या

* बँक कर्मचार्यासह पाच भामट्यांना बेड्या
* अमरावती सायबर पोलिसांची यशस्वी कारवाई
अमरावती /22 जानेवारी : शेअर बाजारात अफाट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 52 लाख 5 हजार रुपयांनी ऑनलाईन फसवणूक करणार्या आंतरराज्यीय टोळीचा अमरावती सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे मध्य प्रदेश आणि नागपूर येथून एका बँक कर्मचार्यासह एकूण पाच आरोपींना अटक केली असून, या टोळीचे जाळे देशभर पसरल्याचे समोर आले आहे.
अमरावती येथील एका गुंतवणूकदाराला ’मोनार्क वेल्थ सर्कल’ नावाच्या व्हॉट्सअॅप समूहात जोडून ’मोनार्क फिन’ नावाचे बनावट भ्रमणध्वनी उपयोजन (अॅप) डाऊनलोड करायला लावले होते. सुरुवातीला या उपयोजनामध्ये केवळ आभासी नफा दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यात आला. अधिक नफ्याच्या हव्यासापोटी फिर्यादीने तब्बल 52 लाख 5 हजार रुपये गुंतवले. मात्र, जेव्हा त्यांनी हे पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना विविध करांच्या नावाखाली अधिक पैशांची मागणी करण्यात आली, ज्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या प्रकरणाचा तपास करताना सायबर पोलिसांनी नागपूर येथील एका संशयास्पद बँक खात्याचा शोध घेतला. तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी प्रथम राजकुमार मुल्लु केबट (24, रा. पिपरिया, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून या गुन्ह्यात मदत करणार्या बँक कर्मचार्याचे आणि इतर साथीदारांचे नाव समोर आले. त्यानुसार, नागपूर येथून रोहित राजेश अहिर, रोहित हरिष कांबळे आणि स्वप्निल प्रल्हाद शेंडे या तिघांना न्यायालयाच्या आदेशाने ताब्यात घेण्यात आले. तसेच, आदित्य शाम होले या बँक कर्मचार्यालाही नागपूरच्या पिली मारबत चौक भागातून अटक करण्यात आली आहे. या आरोपींच्या बँक खात्यांवर देशभर 20 हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे. ही धडक कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त रमेश धुमाळ, सहाय्यक आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर, महेंद्र अंभोरे, सहाय्यक निरीक्षक अनिकेत कासार आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली.




