आज फैसला : महापालिकेचा नवा ‘कारभारी’ कोण?

मुंबईत मंत्रालयात सुटणार राज्याच्या आरक्षणाची लॉटरी

* रोटेशन पद्धतीने सत्ता समीकरणे बदलण्याची चिन्हे

अमरावती /21 जानेवारी : राज्यातील 29 महानगर पालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत आज मुंबईतील मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत पार पडणार असून, अमरावतीचा पुढचा महापौर कोणत्या प्रवर्गाचा असेल याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे.
रोटेशन पद्धतीचा अवलंब होणार असल्याने यावेळी ’खुला प्रवर्ग महिला’ गटासाठी आरक्षण सुटण्याची दाट शक्यता असून, यामुळे राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे. अमरावती महापालिकेत सत्तेची चावी मिळवण्यासाठी सध्या फोडाफोडीच्या राजकारणाला उधाण आले असून 87 जागांच्या सभागृहात 44 हा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने कंबर कसली आहे. भाजप 25 जागांसह युवा स्वाभिमानचे 15, शिंदे सेनेचे 3, बसपाचे 3 आणि वंचितच्या एका सदस्याच्या पाठिंब्यासाठी प्रयत्नशील आहे, तर दुसरीकडे 15 जागा जिंकणारी काँग्रेस एमआयएमच्या 12, राष्ट्रवादीच्या 11 आणि ठाकरे सेनेच्या 2 सदस्यांना सोबत घेऊन चमत्कार घडवण्याच्या तयारीत आहे. चक्राकार पद्धतीने आरक्षण जाहीर होणार असल्याने जुन्या चेहर्‍यांऐवजी नवीन सामाजिक वर्गाला संधी मिळणार हे नक्की आहे. आतापर्यंत डॉ. देवीसिंह शेखावत यांच्यापासून ते चेतन गावंडे यांच्यापर्यंत 16 महापौरांनी शहराचा कारभार पाहिला असून, आजच्या आरक्षणाने अमरावतीच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळणार आहे. कोणत्या गटाचे नशीब उजळते आणि कोण बाजी मारते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

मनपाच्या सत्तेचा पेच आणि गुपित

महापालिकेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने अपक्ष आणि लहान पक्षांचे महत्त्व वाढले आहे. महापौरपदाचे आरक्षण ज्या प्रवर्गासाठी जाहीर होईल, त्यानुसार दोन्ही प्रमुख आघाड्या आपल्या उमेदवाराची निवड करतील. सध्या फोडाफोडीच्या चर्चांना ऊत आला असून आजच्या निर्णयावरच अमरावतीचा पुढचा ’किंग’ ठरणार आहे.

अमरावतीत मतांचे गणित आणि सत्तासंघर्ष 

अमरावतीत भाजपने 19.75 टक्के मतांसह 25 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान टिकवले असले, तरी मतविभाजनामुळे त्यांच्या 20 जागा घटल्या आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने 16.61 टक्के मते घेत शरद पवार गटाला (0.60 टक्के) मोठ्या फरकाने मागे टाकले. शिवसेनेच्या शिंदे गटाने 7.17 टक्के मते मिळवून ठाकरे गटावर मात केली. विशेष म्हणजे, युवा स्वाभिमान पक्षाने 10 टक्क्यांहून अधिक मते घेत प्रस्थापितांना जोरदार टक्कर दिली, ज्यामुळे शहरात नवे राजकीय समीकरण उदयाला आले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button