‘शोले स्टाईल’ आंदोलनाने खळबळ

बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते चढले ‘टावर’वर

बुलढाणा /11 जून : प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा माजी आ.बच्चू कडू यांनी शेतकर्‍यांच्या विविध मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुकुंज मोझरी (जि.अमरावती) येथे बेमुदत उपोषण सुरु केले आहे. आंदोलनाकडे शासन आणि प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील बच्चू कडू यांचे समर्थक तथा जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी आज बुधवारी अचानक ‘टावर’ आंदोलन सुरु केले. प्रहार नेते बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे ‘शोले स्टाईल’ आंदोलन करण्यात येत आहे. प्रशासनाने तात्काळ बच्चू कडू यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन चर्चा करावी, अन्यथा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. या अनोख्या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बच्चू कडू हे गेल्या चार दिवसांपासून शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी व दिव्यांग बांधवांच्या न्याय मागण्यांसाठी उपोषण करत आहेत. मात्र, शासन व प्रशासनाकडून त्यांच्या आंदोलनाची योग्य दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ अजय टप यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

संबंधित बातम्या

Back to top button