जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांचे बिगुल वाजले

बदली प्रक्रियेला वेग येताच शिक्षकांची धाकधूक वाढली

* अमरावती जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची तयारी जोरात

अमरावती /20 जानेवारी : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संवर्गाच्या सन 2026 मधील जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया आता खर्‍या अर्थाने सुरू झाली असून, शिक्षण विभागाने यासंदर्भात कंबर कसली आहे. जिल्हा परिषद अमरावतीचे शिक्षणाधिकारी सतिश मुगल यांनी या संदर्भात कडक आदेश निर्गमित केले असून, तालुक्यातील शिक्षकांची माहिती अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. शासन स्तरावरून निश्चित करण्यात आलेल्या नवीन धोरणानुसार ही सर्व प्रक्रिया राबविली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील शिक्षक वर्गात सध्या मोठी खळबळ उडाली असून, बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची घडामोडी मानली जात आहे. या मोहिमेत विशेष संवर्ग भाग 1 आणि भाग 2 मध्ये मोडणार्‍या शिक्षकांच्या माहितीला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. आजारपण किंवा दिव्यांगत्वाचे निकष असलेल्या शिक्षकांनी विशेष संवर्ग 1 मध्ये गणना होण्यासाठी सक्षम प्राधिकार्‍याचे ’युडीआयडी’ प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. या प्रमाणपत्रांची पडताळणी गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांची समिती अगदी काटेकोरपणे करणार असून, चुकीच्या माहितीवर कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. तसेच, ज्या शिक्षकांना विशेष संवर्ग 2 चा लाभ घ्यायचा आहे, त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याचा 30 किलोमीटर अंतराचा वैध दाखला सादर करावा लागणार आहे. बदली प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि तांत्रिक बाबी वेळेत निकाली काढण्यासाठी अमरावती जिल्हा परिषदेने श्री. गंगाधर मोहने (प्रभारी उपशिक्षणाधिकारी) यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर एक विशेष ’शिक्षक बदली वॉर रूम’ देखील कार्यान्वित करण्यात आली आहे. अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली असून, सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना शाळेतील 5 वर्षांच्या सेवेची अट लागू राहणार नाही, असा महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. 31 मे 2026 पर्यंतच्या रिक्त पदांचा विचार करून ही सर्व माहिती 31 मे पर्यंत संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे. रजेच्या दिवशीही काम करून ही प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश सर्व केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.
विशेष संवर्ग पडताळणी मोहीम -बदली प्रक्रियेत खोटी प्रमाणपत्रे सादर करणार्‍यांचे आता धाबे दणाणणार आहेत. दिव्यांग आणि गंभीर आजाराच्या प्रमाणपत्रांची तालुका समितीमार्फत सूक्ष्म तपासणी केली जाईल. तसेच 30 किमी अंतराच्या दाखल्याची सत्यता केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वैध प्रमाणपत्रावरूनच ठरवली जाणार असून, चुकीचा अभिप्राय आढळल्यास संबंधित शिक्षकावर प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Back to top button