स्मार्ट (टिओडी) मीटरमुळे वीज बिलाच्या तक्रारी हद्दपार होणार
स्मार्ट मीटर पर्याय नसून आवश्यकता

अमरावती /19 जानेवारी : आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेले स्मार्ट मीटर (टिओडी) व्दारे स्वयंचलित मीटरचे वाचन होत असल्याने अचूक बिले मिळत असून होत असलेला वीज वापर वीज ग्राहकांना दर तासाला मोबाईलवर पहायला मिळतो. त्यामुळे वीज वापरावर थेट नियंत्रण ठेवता येते.
अचूक आणि वेळेत बिल देण्यास उपयुक्त ठरणारे महावितरणचे स्मार्ट (टिओडी) मीटर हे वीज ग्राहकांसाठी पर्याय नसून आवश्यकता आहे. स्मार्ट मिटरमुळे सरासरी वीज बिल, मीटरचे वाचन झाले नाही या व अशा तक्रारी हद्दपार होणार आहे. त्यामुळे एकुनच वीज ग्राहकांसाठी फायद्याचे असणारे मीटर बसविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी केले आहे.
इज ऑफ लिव्हींग नुसार वीज ग्राहकांना तक्रार शुन्य सेवा देण्यासाठी स्मार्ट मीटर उपयुक्त ठरणार आहे. वीज ग्राहकांना स्मार्ट (टिओडी) मीटर लावणे हा शासन पुरस्कृत आणि शासन अनुदानित असलेला उपक्रम पूर्ण देशभरात राबविण्यात येत आहे.
परिमंडळात लागले 2 लाख 96 हजार स्मार्ट मीटर-अचूक वीजबिलासोबत दिवसा वीज वापराचा लाभ वीज ग्राहकांना मिळावा यासाठी जीनस कंपनीसोबत महावितरणने पुढाकार घेत कर्मचार्यांच्या माध्यमातून टिओडी मीटर बसविण्याच्या कामाला गती दिली आहे. परिमंडळात टप्या – टप्प्याने सर्वच वर्गवारीतील (कृषी ग्राहक वगळून) वीज ग्राहकांना स्मार्ट ( टिओडी) मीटर बसविण्यात येत असून, परिमंडळात 2 लाख 96 हजार 328 मीटर लावण्यात आले आहे. यामध्ये अमरावती 1 लाख 86 हजार 399 आणि यवतमाळ जिल्ह्यातील 1 लाख 9 हजार 929 मीटरचा समावेश आहे.
स्मार्ट मीटर असेल तरच दिवसा वीज वापराची सवलत शक्य
महावितरणकडून राज्यातील घरगुती वीज ग्राहकांसाठी स्मार्ट (टिओडी) मीटरच्या माध्यमातून दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रतियुनिट 80 पैसे ते 1 रूपया सवलत देण्यात येत आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षासाठी निश्चित केलेल्या वीज दरानुसार घरगुती ग्राहकांना टिओडीप्रमाणे वीज दरात सवलत 1 जुलै 2025 पासून सुरू केली आहे. टिओडी मीटर नसल्यास वीज ग्राहकांना दिवसा वीज वापरावर मिळणार्या या सवलतिचा लाभ मिळणार नाही.




