भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसची महामोर्चेबांधणी
अमरावती महापालिकेत सत्तांतराचे नवे वारे

स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांचे संकेत
अमरावती /19 जानेवारी : महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी शहरात नव्या राजकीय संघर्षाला तोंड फोडले असून, सर्वाधिक 45 जागा जिंकूनही भारतीय जनता पक्षाची सत्तास्थापनेची वाट बिकट झाली आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या चार जागांची उणीव भरून काढताना भाजपची दमछाक होत असतानाच, काँग्रेसने सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून सत्तेचा नवा मार्ग शोधला आहे. या राजकीय सारीपाटावर काँग्रेस आपल्या 15 जागांसह एमआयएमच्या 12, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 2, बहुजन समाज पक्षाच्या 3 आणि वंचित बहुजन आघाडीच्या 1 अशा एकूण 32 सदस्यांची मोट बांधत आहे. या गणितात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 11 सदस्य सहभागी झाल्यास हा आकडा 43 वर पोहोचतो, जो बहुमताच्या अगदी जवळ आहे. भाजपसोबत गेल्यास राणा दाम्पत्याची साथ मिळेल, मात्र ही साथ अजित पवार गटाला मान्य नसल्याने काँग्रेसच्या बाजूने पारडे जड होताना दिसत आहे. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटही भाजपच्या दबावामुळे नाराज असून, स्थानिक पातळीवर भाजपला धडा शिकवण्यासाठी ते काँग्रेसला छुपी किंवा उघड मदत करण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्तेचे समान वाटप करण्यासाठी ’अडीच-अडीच वर्षे’ हा सूत्रबद्ध पर्याय समोर ठेवला जात आहे. ही संपूर्ण राजकीय जुळवाजुळव करणे स्थानिक नेत्यांच्या कक्षेबाहेर असून, ज्येष्ठ नेते डॉक्टर सुनील देशमुख यांनी पुढाकार घेतल्यास भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे सहज शक्य होईल. भाजपची केंद्रीय आणि राज्य स्तरावर सत्ता असली, तरी अमरावतीमध्ये त्यांना विरोधात बसवून एक नवा राजकीय प्रयोग काँग्रेसच्या माध्यमातून आकारास येऊ शकतो. राणा दाम्पत्याच्या इशार्यावर चालण्याऐवजी स्वाभिमानाने विरोधी बाकावर बसणे भाजपला अधिक सोयीचे ठरेल, असा एक सूरही उमटत आहे. एकूणच, अमरावतीचा महापौर कोणत्या गटाचा होणार, याचा फैसला आता वरिष्ठ पातळीवरील चाणक्यनीतीवर अवलंबून आहे.




