शिक्षिका शीतल सरदार यांची राष्ट्रीय पातळीवर भरारी

राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेत मारली बाजी

* राष्ट्रीय स्पर्धेसाठी ठरल्या पात्र

अमरावती /18 जानेवारी : अध्यापनाचे कार्य , कुटुंबाची जबाबदारी आणि मनात जपलेली कलेची आवड या तिन्हींचा समतोल साधत निर्मला विद्यालय, कापुसतळणी येथील सहाय्यक शिक्षिका शीतल अर्जुन सरदार (तायडे) यांनी राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून राष्ट्रीय स्तरावर होणार्‍या स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा मान मिळविला आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने 17 जानेवारी रोजी हिंगोली येथे आयोजित राज्यस्तरीय शिक्षक व अधिकारी लोकनृत्य स्पर्धेत शिक्षिका शीतल सरदार यांनी लावणी या लोकनृत्य संवर्गात सादर केलेल्या दमदार नृत्याने परी क्षकांची मने जिंकली. या स्पर्धेत राज्यभरातील अनेक शिक्षक व अधिकारी यांनी विविध लोकनृत्य प्रकारांत सहभाग घेतला होता. मात्र अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत केवळ दहा स्पर्धकांची निवड करण्यात आली, त्यामध्ये शीतल सरदार यांनी पहिल्या दहामध्ये स्थान मिळवत राष्ट्रीय पातळीवर जाण्याची संधी मिळविली.अध्यापनाच्या दैनंदिन कामकाजासोबत कौटुंबिक जबाबदार्‍या सांभाळतही कलेची आवड जिद्दीने जोपासता येते, हे शीतल सरदार यांनी आपल्या यशातून दाखवून दिले आहे. त्यांच्या या यशामागे पती विशाल तायडे (महाराष्ट्र सुरक्षा बल), आई लतिका सरदार, सासरे ज्ञानेश्वर तायडे व सासू प्रमिला तायडे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या अभूतपूर्व यशाबद्दल प्राचार्य रेव्ह. फादर तवामणी, उपप्राचार्य डालके सर, पर्यवेक्षिका बहुरूपी मॅडम तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकवृंदांनी शीतल सरदार यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.शिक्षक असूनही कला, संस्कृती व लोकपरंपरेचा अभिमान जपत राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेली ही यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button