फडणवीसांचे मामेभाऊ विवेक कलोती, आ.भारतीय यांचे बंधू पराभूत

अमरावतीत भाजपला दुहेरी धक्का

काँग्रेस-स्वाभिमानचा विजय

अमरावती /16 जानेवारी : अमरावती महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या टप्प्यातच राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. एकूण 87 जागांच्या अमरावती महापालिकेत काही प्रभागांचे निकाल हाती येताच वातावरण तापलं आहे. विशेषतः पहिल्याच फेरीत भाजपला दोन मोठे धक्के बसल्याने शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचे भाऊ तुषार भारतीय या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांचा पराभव झाला आहे.
प्रभाग क्रमांक 14 मधील निकाल भाजपसाठी विशेष धक्कादायक ठरले आहेत. या प्रभागातून काँग्रेसने क्लीन स्वीप साधत चारही जागा जिंकल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांचा याच प्रभागात पराभव झाला आहे. काँग्रेसच्या विजयामुळे मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. फटाके, घोषणा आणि ढोल-ताशांच्या गजरात काँग्रेस समर्थकांनी या विजयाचं जोरदार सेलिब्रेशन केलं. भाजपसाठी हा निकाल अनपेक्षित मानला जात असून, सुरुवातीच्या फेरीतच सत्ता समीकरणांवर परिणाम होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.
प्रभाग क्रमांक 14 अ मधील निकालांचा तपशील पाहिला तर काँग्रेसच्या उमेदवारांनी भाजपवर स्पष्ट आघाडी घेतल्याचं दिसून येतं. विलास इंगोले यांनी भाजपचे अविनाश देऊळकर यांचा 12,217 विरुद्ध 4,934 मतांनी पराभव केला. सुनीता भेले यांनी संगीता बुरंगे यांचा 7,397 विरुद्ध 3,770 मतांनी पराभव केला. सुशीला रतावा यांनी गंगा खारकर यांच्यावर 8,625 विरुद्ध 5,956 मतांची आघाडी घेत विजय मिळवला. तर संजय शिरभाते यांनी भाजपचे विवेक कलोती यांचा 5,645 विरुद्ध 4,726 मतांनी पराभव करत भाजपला मोठा धक्का दिला आहे. आ.श्रीकांत भारतीय यांचे भाऊ तुषार भारतीय पराभूत-दुसरीकडे, साई नगर प्रभागातील निकालांनीही भाजपच्या अडचणी वाढवल्या आहेत. या प्रभागात भाजपचे नेते तुषार भारतीय यांचा पराभव झाला आहे. आमदार श्रीकांत भारतीय यांचे भाऊ असलेल्या तुषार भारतीय यांच्याकडून भाजपला मोठी अपेक्षा होती. मात्र रवी राणांचे निकटवर्तीय आणि युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार सचिन भेंडे यांनी विजय मिळवत बाजी मारली आहे. साई नगरमधील ही निवडणूक आमदार रवी राणांनी प्रतिष्ठेची बनवली होती. त्यामुळे या निकालाला स्थानिक राजकारणात विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

संबंधित बातम्या

Back to top button