महानगरपालिका निवडणुकीचा निकाल सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार
मतमोजणीची पद्धत ठरवण्याचे अधिकार आता आयुक्तांच्या हाती

अमरावती /13 जानेवारी : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सत्तेचा फैसला येत्या 16 जानेवारीला होणार असून, मतमोजणीची नेमकी प्रक्रिया कशी असावी याचे सर्वाधिकार आता स्थानिक महापालिका आयुक्तांकडे सोपवण्यात आले आहेत. प्रभागानुसार मतमोजणी करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला राजकीय पक्षांनी विरोध दर्शवल्यानंतर हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. 15 जानेवारीला होणार्या मतदानानंतर, 16 जानेवारीला सकाळी 10 वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल आणि सायंकाळी 4 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी वर्तवली आहे. प्रशासकीय नियोजनानुसार प्रत्येक केंद्रावर 16 टेबल लावले जाणार असून, त्यावर प्रभागनिहाय किंवा एकत्रित पद्धतीने ईव्हीएममधील मतांची पडताळणी केली जाईल. दोन्ही पद्धतींमध्ये वेळेचे मोठे अंतर नसल्याने पारदर्शकतेला प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबई वगळता इतर 28 महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे मतदारांना किमान तीन ते चार मते देणे अनिवार्य आहे, अन्यथा त्यांचे मतदान ग्राह्य धरले जाणार नाही. यंदा मतदारांसाठी ’नोटा’ म्हणजेच ’कोणालाही मत नाही’ हा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मुंबईतील मतमोजणीचा तिढा सुटणार
मुंबई महानगरपालिकेच्या 227 प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी करायची की प्रभागनिहाय, यावर राजकीय पक्षांच्या हरकतींमुळे अद्याप खल सुरू आहे. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पालिका आयुक्त भूषण गगरानी यांच्याशी चर्चा केली असून, निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या सल्ल्याने अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. मुंबईत शक्यतो सर्व प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी घेण्यावर प्रशासनाचा विचार सुरू आहे.




