ईव्हीएमच्या जोरावर लोकशाहीचा गळा घोटण्याचे षडयंत्र

मनपा निवडणुकीच्या जाहीर सभेतून प्रतापगढींचा सत्ताधार्‍यांवर हल्ला

* नवनीत राणांच्या वादग्रस्त विधानांसह ओवेसींच्या राजकारणाचा समाचार

अमरावती /13 जानेवारी : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराचा शेवटचा दिवस गाजवताना काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढी यांनी सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्षांवर घणाघाती टीका केली. अमरावतीमधील एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचा पराभव हा जनतेने नव्हे, तर ईव्हीएम यंत्रणेने केल्याचा खळबळजनक आरोप केला. स्थानिक समस्या आणि विकासाचे मुद्दे बाजूला सारून सत्ताधारी केवळ धार्मिक ध्रुवीकरण आणि विसंगत विधाने करून जनतेची दिशाभूल करत असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. येत्या 15 जानेवारीला होणार्‍या मतदानापूर्वी प्रतापगढी यांनी मतदारांना सावध करत, लोकशाही टिकवण्या साठी काँग्रेसच्या चिन्हावरच विश्वास दाखवण्याचे आवाहन केले. प्रतापगढी यांनी आपल्या भाषणात भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या ’चार मुले जन्माला घाला’ या विधानाचा खरपूस समाचार घेतला. ही महानगरपालिकेची निवडणूक आहे की लोकसंख्या वाढवण्याची कार्यशाळा, असा उपरोधिक सवाल त्यांनी उपस्थित केला. मुंबईतील नेत्यांचा ’दीड फुटी’ असा उल्लेख करत त्यांनी सत्ताधार्‍यांच्या अहंकारी वृत्तीवर प्रहार केला. तसेच एमआयएमचे प्रमुख ओवेसी यांना लक्ष्य करताना त्यांनी हिजाबच्या मुद्द्यावरून त्यांच्या दुटप्पी राजकारणाचा बुरखा फाडला. ज्या पक्षाने एकाही हिजाब परिधान करणार्‍या महिलेला आमदार किंवा खासदार केले नाही, त्यांनी हिजाब परिधान करणारी महिला पंतप्रधान होईल अशी स्वप्ने दाखवणे हा निव्वळ दांभिकपणा असल्याचे ते म्हणाले. देशाच्या संसदेत जेव्हा राहुल गांधी जनतेसाठी संघर्ष करत होते, तेव्हा अजित पवार गटाचे खासदार मोदींच्या कळपात बसून सत्तेचा आनंद घेत होते, अशी टीका त्यांनी केली. सत्ताधारी पक्ष केवळ भारत-पाकिस्तान आणि हिंदू-मुस्लिम या विषयांवर राजकारण करून विकासकामांपासून पळ काढत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. निवडणुकीच्या काळात पैशांचे आमिष दाखवले जाईल, परंतु ते पैसे स्वीकारून योग्य उमेदवाराला मतदान करून लोकशाहीचा स्वाभिमान जागा ठेवावा, असा सल्लाही त्यांनी दिला. स्थानिक पातळीवर नगरसेवकांचे महत्त्व ओळखून अमरावतीची ताकद बळवंत वानखडे यांच्या पाठीशी उभी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सत्तेचा माज आणि यंत्रणेचा गैरवापर-ईव्हीएमच्या संशयास्पद कारभारावर बोट ठेवताना इम्रान प्रतापगढी यांनी सत्ताधार्‍यांच्या दडपशाहीवर तीव्र संताप व्यक्त केला. विकासाच्या मुद्द्यांवर बोलण्याऐवजी धार्मिक द्वेष पसरवणार्‍या आणि पाकिस्तानचा अनावश्यक जप करणार्‍या नेत्यांनी लोकशाहीची थट्टा मांडली आहे. अमरावतीचा स्वाभिमान टिकवण्यासाठी आणि खोट्या प्रचाराला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी मतदारांनी काँग्रेसच्या विचारांना साथ देणे काळाची गरज आहे.

संबंधित बातम्या

Back to top button