244 मतदान केंद्रांवर थेट प्रक्षेपणाद्वारे राहणार करडी नजर
मनपा निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात

* निर्भय वातावरणात मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
अमरावती /13 जानेवारी : महानगर पालिकेच्या 87 जागांसाठी उद्या 15 जानेवारी रोजी होणारे मतदान अत्यंत पारदर्शक, सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.
एकूण 805 मतदान केंद्रांपैकी ज्या 244 केंद्रांवर मतदारांची मोठी वर्दळ असते, अशा ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी थेट चित्रीकरण अर्थात वेब-कास्टिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत होणार्या या प्रक्रियेत मतदारांना कोणत्याही दबावाशिवाय आपले मत नोंदवता येईल. यंदा प्रभाग रचनेनुसार एका मतदाराला चार मते द्यावी लागणार असल्याने, प्रत्येक व्यक्तीला किमान दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रत्येक केंद्रावर मतदारांची संख्या 800 ते 850 पर्यंत मर्यादित ठेवली आहे, जेणेकरून रांगा लांबणार नाहीत आणि मतदान प्रक्रिया वेगाने पार पडेल. पोलीस उपायुक्त रमेश धुमाल यांनी स्पष्ट केले आहे की, शहरात सध्या एकही केंद्र संवेदनशील नसले तरी, खबरदारी म्हणून ज्या इमारतींमध्ये जास्त केंद्रे आहेत तिथे कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाईल. जिथे मतदारांना धमकावण्याचे प्रकार घडू शकतात, अशा भागात विशेष गस्त वाढवण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि चोख पोलीस बंदोबस्त यांच्या संगमातून ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. महानगरपालिकेच्या 22 प्रभागांमधील हा लोकशाहीचा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी कर्मचारी आणि अधिकारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
चार मतांसाठी प्रशासनाचे सुटसुटीत नियोजन-यंदाच्या निवडणुकीत मतदारांना मतदान यंत्रावरील चार बटणे दाबावी लागणार असल्याने प्रक्रियेत अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. हे आव्हान पेलण्यासाठी प्रशासनाने प्रत्येक केंद्रावरील मतदारांची संख्या कमी करून ती 850 च्या आत ठेवली आहे. यामुळे केंद्रांची संख्या वाढली असली तरी मतदारांचा वेळ वाचणार असून मतदान प्रक्रिया अधिक गतिमान आणि सोपी होणार आहे.




