डोनाल्ट ट्रम्प पंतप्रधान मोदींचे काका

चीनने भारतीय भूमी बळकावली तरीही केंद्र सरकारची शरणागती

* वक्फ कायद्यावरून अजित पवारांच्या भूमिकेवर ओवैसींचा बोचरा सवाल

अमरावती /10 जानेवारी : भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे सातत्याने विशिष्ट समुदायाप्रती द्वेष पसरवण्याचे राजकारण करत आहेत, परंतु देशाच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचे बळ दिले असल्यामुळे अशा द्वेषमूलक राजकारणाचा कोणताही फायदा होणार नाही, असा खणखणीत प्रहार एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केला. अमरावती येथील जाहीर प्रचार सभेत बोलताना त्यांनी जागतिक राजकारणापासून ते स्थानिक प्रश्नांपर्यंत अनेक मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुती सरकारला धारेवर धरले. विशेषतः अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार कराराबाबत केलेल्या विधानावरून ओवैसी यांनी मोदींना ’प्लीज सर’ या शब्दाची आठवण करून दिली. ट्रम्प हे पंतप्रधान मोदींचे ’अंकल’ आहेत का? असा उपरोधिक सवाल करत त्यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारताची एक हजार चौरस किलोमीटर जमीन चीनने बळकावलेली असताना आणि पंधरा गस्तीच्या ठिकाणांवर भारतीय सैन्याला जाता येत नसताना, केंद्र सरकार चीनला गुंतवणुकीसाठी निमंत्रण देत आहे, हा कसला राष्ट्रवाद आहे? अशी विचारणा करत ओवैसी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला. राज्यातील राजकारणावर भाष्य करताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर बोचरी टीका केली. हे तिन्ही नेते मुंबईत बसून केवळ सत्तेची मलाई खाण्यात मग्न आहेत, असा टोला त्यांनी लगावला. पूर्वीच्या नगरपालिका निवडणुकांमध्ये एकमेकांकडे पाठ फिरवून बसणारे हे नेते आता सत्तेसाठी एकत्र आले आहेत, हा केवळ सत्तेचा खेळ असून ते एकमेकांची पाठ खाजवण्याचे काम करत आहेत, असेही ते म्हणाले. विशेषतः अजित पवार यांनी आपल्या काकांशी गद्दारी केल्याची टीका करत, जे आपल्या रक्ताच्या नात्याचे होऊ शकले नाहीत ते जनतेचे काय होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारने वक्फ संपत्ती हडपण्यासाठी आणलेल्या जाचक कायद्याला अजित पवारांनी विरोध का केला नाही, असा सवाल करत त्यांनी महायुतीमधील अंतर्विरोध उघड केला. भाजप आणि संघाने पसरवलेली द्वेषाची आग विझवण्यासाठी जनतेने मतदानाचे शस्त्र प्रभावीपणे वापरावे, असे आवाहन करत ओवैसी यांनी ही लढाई संविधानाच्या संरक्षणाची असल्याचे अधोरेखित केले.
चीनच्या आक्रमकतेवर सरकारची चुप्पी का?-चीनने भारतीय सीमा ओलांडून मोठ्या भूभागावर ताबा मिळवला आहे. देशाला राष्ट्रवादाचे धडे देणारे सरकार चिनी गुंतवणुकीसाठी पायघड्या घालत आहे. पंधरा गस्ती केंद्रांवर प्रवेश नाकारला जाणे ही शरणागती असून, हा देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. सरकारने यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी ओवैसी यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात मांडली.

संबंधित बातम्या

Back to top button