नवीवस्ती-बडनेर्‍यात ‘पाना’ चिन्हाचा जोर, आ.रवी राणा यांच्या जनसंवाद यात्रेने प्रचाराला उधाण

युवा स्वाभिमान पार्टीकडे नागरिकांचा कल

अमरावती /10 जानेवारी : अमरावती महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 22 नवीवस्ती-बडनेरा येथे युवा स्वाभिमान पार्टीच्या प्रचाराला निर्णायक गती मिळाली आहे. आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भव्य जनसंवाद व आशीर्वाद यात्रेमुळे संपूर्ण प्रभागात ‘पाना’ या निवडणूक चिन्हाची जोरदार चर्चा सुरू असून, नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यमान नगरसेवकांच्या अकार्यक्षम आणि दुर्लक्षपूर्ण कारभारामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, आता विकासाभिमुख आणि जनतेशी थेट संवाद साधणार्‍या युवा स्वाभिमान पार्टीकडे मतदारांचा कल स्पष्टपणे वळताना दिसत आहे.
या प्रभागातील अधिकृत उमेदवार अजय जयस्वाल, रंजनी डोंगरे, किशोर जाधव आणि गौरी मेघवानी हे सातत्याने मतदारांच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेत आहेत. हे उमेदवार सर्वसामान्य नागरिकांमध्ये सहज मिसळून काम करणारे असल्यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याविषयी विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे, असे आमदार रवि राणा यांनी सांगितले.
जनसंवाद व आशीर्वाद यात्रेची सुरुवात श्रीराम मंदिर, झिरी येथून झाली. त्यानंतर ही यात्रा हमालपुरा, लढ्ढा प्लॉट, अशोक नगर, सुभाष चौक, मिलचाळ, आर.डी.आय.के. महाविद्यालय परिसर, समता चौक, स्वराज्य मंडळ, जयस्तंभ चौक, मोठी मशिद, झंझाडपुरा, सिंधी कॅम्प, इंदिरा नगर, गवळीपुरा, पंचशील नगर, आदर्श चौक, कुरेशी नगर, गुरुद्वारा लकडगंज, माळीपुरा, संभाजी नगर, महाराष्ट्र बँक रोड, अनाज मार्केट, सिंधी मार्केट असा विस्तृत मार्ग पार करत मुख्य प्रचार कार्यालयात यात्रेचा समारोप झाला. या संपूर्ण यात्रेदरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी आमदार रवि राणा आणि युवा स्वाभिमान पार्टीच्या उमेदवारांचे फुलांची उधळण करून जंगी स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या जल्लोषात नवीवस्ती-बडनेरा परिसर अक्षरशः दुमदुमून गेला. अनेक ठिकाणी नागरिकांनी आपल्या समस्या थेट आमदार रवि राणा यांच्यासमोर मांडल्या, त्यावर तात्काळ उपाययोजना आणि भविष्यात ठोस तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी बोलताना आमदार रवि राणा म्हणाले, प्रभाग क्रमांक 22 मधील नागरिकांना केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष विकास हवा आहे. युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणारे आहेत. येणार्‍या काळात नवीवस्ती-बडनेर्‍याचा चेहरामोहरा बदलण्याचा आम्ही ठाम संकल्प केला आहे. यावेळी त्यांनी रंजनी डोंगरे (बटन क्र. 08), अजय जयस्वाल (बटन क्र. 06), गौरी शैलेंद्र मेघवानी (बटन क्र. 08) आणि किशोर जाधव (बटन क्र. 09) यांना ‘पाना’ या निवडणूक चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे कळकळीचे आवाहन नागरिकांना केले. एकूणच, या भव्य जनसंवाद व आशीर्वाद यात्रेमुळे प्रभाग क्रमांक 22 नवीवस्ती-बडनेरा येथे युवा स्वाभिमान पार्टीच्या प्रचाराला मोठे बळ मिळाले असून, येत्या महानगरपालिका निवडणुकीत या प्रभागात परिवर्तन निश्चित असल्याचा ठाम विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button